शहरात नेमकी कोणत्या प्रकारची वृक्ष संपदा आहे. त्यांची संख्या किती? कोणत्या भागात वृक्ष लागवड करण्याची गरज आहे याचा आराखडा तयार करण्याचे काम आणि वृक्षारोपण करण्याच्या कामाचे कागदी घोडे नाचविण्यातच महानगरपालिकेने धन्यता मानली आहे. त्यामुळे कोणती व किती झाडे लावण्यात आली याचा लेखाजोखा मागील अनेक वर्षांपासून मनपाच्या दप्तरी नोंदच नसल्याचे दिसून येत आहे.
वृक्ष तोड प्रकरणी नवी नियमावली करण्यापलीकडे प्राधिकरणाला अधिक झेप घेता आली नाही. रखडलेल्या वृक्ष गणना व नियोजन अभावी शहराची पर्यावरणीय हानी होत असल्याची खंत निसर्गप्रेमीतून व्यक्त होत आहे. जिल्ह्यात २ हजाराहून अधिक वृक्षांच्या प्रजाती आढळतात. यामध्ये बेळगाव शहरातील वृक्षसंपदेचा मोठा सहभाग आहे. नागरी वृक्ष तोडणी कायद्द्यानुसार शहरातील वृक्ष गणना सक्तीची आहे. शहरातील वृक्षांची सद्य परिस्तिथी या सर्वेक्षणानुसार नोंद करून ठेवणे गरजेचे आहे. मात्र मनपाने याकडे दुर्लक्ष केले आहे, असे दिसून येते.
दर पाच वर्षांनी वृक्षांची गणना करणे गरजेचे आहे. मात्र अनेक वर्षांपासून याकडे दुर्लक्ष करून कागदी घोडे नाचविण्यातच धन्यता मानण्यात आली आहे.
धोकादायक झाडे तोडण्यातच मनपाचा हातखंडा असल्याचे दिसून येत आहे मात्र दरवर्षी किती रोपांची लागवड करण्यात येते आणि किती वृक्ष जगविले जातात याकडे दुर्लक्ष करून निसर्ग प्रेमींचा रोष ओढवून घेतला आहे.
वनविभागाकडून जरी वृक्ष लागवडीसाठी रोपे देण्यात येत असली तरी याची खात्री करून घेण्याचे काम मनपा प्रशासनाकडे आहे. मात्र झाडे लावा आणि ती जगविण्याकडे दुर्लक्ष करा असाच मनपाचा नारा असल्याचे दिसून येत आहे. मागील काही वर्षापासून ही गणना करण्यात आली नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. तेंव्हा यापुढे तरी शहरातील वृक्ष गणना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
ज्या क्षेत्रात भरपूर पैसे असतात त्याकडे मनपाचे लक्ष अधिक असते पण जेथे सामाजिक हिताचा विषय आहे तेथे मनपा कमी पडत आहे, तेंव्हा मनपाने आता खावबेगिरी बंद करून प्रत्यक्षात जन आणि पर्यावरण हिताची कामे घ्यायला हवी.