मागील अनेक दिवसांपासून बेळगाव शहर परिसरात संततधार पावसामुळे पाणीचपाणी झाले आहे. मात्र बळारी नाला परिसरातील पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली आहे.
काही नदी काठच्या व बळारी नाल्यालगत असलेली पिके मागील काही दिवसापासून पाण्याखाली गेली आहेत. ही पिके पाण्याखाली गेल्यामुळे त्यांना धोका निर्माण झाला आहे. अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी काही पिके वाया गेली आहेत. त्यामुळे यापुढे जर पाऊस गेला तर काही प्रमाणात पिके वाचविण्यास मदत होणार आहे.
सुरुवातीच्या वेळी जोरदार पाऊस झाला. या पावसात बऱ्याच पिकांना फटका बसला होता. त्यांनतर ८ ते १० दिवस पाऊस गेला आणि पिकांना जीवदान मिळाले. त्यानंतर पावसाने संततधार सुरू केली ती आजतागायत सुरूच आहे. या पावसामुळे काही ठिकाणी पाणीचपाणी झाले आहे. यामुळे बळारी नाल्या लागत असलेल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
बळारी नाला परिसरात वारंवार पुराची परिस्थिती निर्माण होते. याचे मुख्य कारण म्हणजे हा नाला सफाई करण्याकडे होणारे दुर्लक्ष. यावेळी मात्र काही शेतकऱ्यांनी स्व खर्चाने नाला सफाई करून घेतला आहे. तरी देखील पुराचा धोका कायम आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे पिके कुजण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर आणखी काही दिवस हा पाऊस असाच राहिला तर पिके खराब होणार आहेत.
पाऊस पडला नाही तरी चिंता आणि जास्त पडला तरी चिंता अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे.