लोकसभा निवडणुकीचे वारे आत्तापासूनच वाहत आहेत. बेळगाव लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून विध्यमान विधानपरिषद सदस्य विवेकराव पाटील यांना संधी मिळू शकेल असे वातावरण सध्या आहे. जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी कौल दिल्यास विवेकराव बेळगावचे काँग्रेसचे खासदारपदाचे उमेदवार ठरू शकणार असून तसे चित्र सध्या निर्माण झाले आहे.
विवेकराव हे अनेक पिढ्यांनी सत्ता व समाज कारण केलेल्या घराण्याचे सदस्य आहेत. रमेश जारकीहोळी आणि त्यांचे सख्य आहे. मागील विधानपरिषद निवडणुकीत त्यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला होता, शिवाय सध्या जारकीहोळी यांचेही पारडे राज्य काँग्रेस मध्ये जड आहे यामुळे त्यांच्या एका शब्दावर हे काम होऊ शकते.
मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सत्ता मिळवली होती. त्यावेळी बेळगाव जिल्ह्यातून काँग्रेसचे फक्त ६ आमदार निवडून आले होते. यावेळी काँग्रेसचा राज्यात पाडाव झाला आणि फक्त ८० आमदार निवडून येऊ शकले आहेत पण बेळगाव जिल्ह्यात ८ आमदार काँग्रेसचे निवडून आले आहेत यामुळे याचे श्रेय पूर्णपणे रमेश जारकीहोळी यांना जात आहे. याचा परिणाम म्हणून रमेश जारकीहोळी यांच्या शब्दावर विवेकराव हे तगडे उमेदवार काँग्रेसतर्फे निवडले जाणार असे काँग्रेस वर्तुळात बोलले जात आहे.
पक्षाने आतापासूनच उमेदवार चाचपणी सुरू केली आहे. विध्यमान आमदार आणि मागच्या वेळी काँग्रेसने लोकसभेला उमेदवारी दिलेल्या लक्ष्मी हेबाळकर यांनी तर आपल्याला लोकसभेत स्वारस्य नाही असे जाहीर केले आहे. सर्वाधिक मताधिक्याने जनतेने आपल्याला आमदार केले आहे तेंव्हा त्यांची सेवा करणार असे त्या म्हणाल्या आहेत. त्यांच्या भावालाही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू होते पण त्याचा निभाव लागणे कठीण आहे. जारकीहोळी बंधुपैकी एकाच विचार होणार का? असाही प्रश्न आहे पण या साऱ्या परिस्थितीत विवेकराव चान्स मारणार आणि त्यांना संधी मिळाल्यास ते निवडूनही येतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.
विवेकराव पाटील हे सायलेंट राजकारणी म्हणून प्रसिद्ध आहेत. शाहू महाराजांचे अंगरक्षक म्हणून त्यांच्या पूर्वजांनी काम केले आहे. धनगर समाजाचा मोठा पाठींबा आणि इतर सर्व समाजातही चांगला मान यामुळे त्यांनी आपली वेगळी छाप पाडली आहे, याचा उपयोग काँग्रेस तीनवेळा हरलेली जागा जिंकून घेण्यासाठी करणार असे दिसत आहे.