बेळगाव पाठोपाठ खानापूर तालुक्यात देवही बनले असुरक्षित बनले असून अनेक गावातून चोरीचे प्रकार समोर आले आहेत.शनिवारी रात्री नंजीनकोडल, जुंजवाड, सागरे, रंजनकोडी या गावातील पाच मंदिरांना चोरटय़ांनी लक्ष बनविले
नंजीनकोडल ता. खानापूर येथील भरवस्तीतील लक्ष्मी मंदिरात धाडसी चोरीचा प्रकार घडला. नुकताच पार पडलेल्या यात्रेत जमा झालेले अंदाजे दिड किलोचे चांदीचे दागिने व आठ तोळे देवीची आभूषणे असा तीन लाखाचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.
मंदिराचा लाकडी दरवाजा तोडून चोरटय़ांनी देवीच्या अंगावरील दागिन्यांची चोरी केली आहे. तिजोरी फोडता आली नसल्याने आतील ऐवज हाती लागू शकला नाही. गावच्या मध्यभागी हे मंदिर आहे. पूर्व तयारीनिशी हा प्रकार तडीस नेण्यात आल्याचा अंदाज आहे.
जुंजवाड येथील लक्ष्मी मंदिरातील सोने चांदीचे दागिने, विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील मुर्तींवरील चांदीची किरीट तर सागरे व रंजनकोडी येथील मंदिरातही चोरीच्या घटना घडल्या आहेत. एकाच रात्रीत परिसरातील चार गावातील मंदिरामध्ये चोरी झाली असल्याने एकाच टोळीचा हात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नंदगड पोलिस पुढील तपास करत आहेत.