रेशन च्या साहित्याची चुकीच्या मार्गाने तस्करी करणाऱ्या तिघांना बेळगाव पोलिसांनी अटक केली आहे. रेशन मधून वाटला जाणारा ८१००० रुपयांचा ५४०० किलो तांदूळ ते घेऊन जात होते. वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या दोन महिंद्रा पीक अप वाहनांवरही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
रफिक तिगडी, उळीवेश बसाप्पा कलावरू ( दोघे रा. बैलहोंगल) हे दोघे वाहनचालक आणि मुख्य वाहतूकदार मंजू उर्फ प्रवीण बसाप्पा पावटे(रा. बैलहोंगल) यांना अटक करून बेळगाव न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
भा द वि कलम ४०३, ४२०,३४ व १९५५ च्या कायद्यातील कलम ७ नुसार त्यांच्यावर बागेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेळगाव रुरल चे एसीपी, हिरेबागेवाडीचे सिपीआय, अन्न निरीक्षक बेळगाव आणि पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे.
शुक्रवारी दुपारी १ वाजता दोन महिंद्रा पीक अप वाहनातून हा तांदूळ घेऊन जात होते. हलगा जवळ त्यांना अडवले असताना तो तांदूळ रेशनचा असल्याचे समजले.
मंजू उर्फ प्रवीण याने हा तांदूळ १० रुपये दराने खरेदी करून बेळगाव येथील व्यक्तीशी १५ रुपये दराने विकण्याचा व्यवहार केला होता. त्यासाठी तो बेळगावला घेऊन येत होता. बैलहोंगल येथून बेळगावला येत असताना ही कारवाई झाली.