मृग आणि आर्द्राने दिलेल्या ओढीनंतर पुनर्वसू बरसणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र सोमवार पासून काही प्रमाणात का असेना पावसाने सुरुवात केल्याने साऱ्यांच्याच आशा पल्लवीत झाल्या आहेत. सोमवार आणि मंगळवारी पडलेल्या पावसामुळे पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र दोन दिवस पडलेले पुनर्वसू नक्षत्र अशीच साथ देणार का? असा प्रश्न मात्र भेडसावणारा आहेच.
मध्यंतरी जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे कोळपणीचे हंगाम शेतकऱ्यांनी साधले आहे. आता पर्यंत भाताबरोबरच बटाटा, सोयाबीन आदी पिकांची वाढ चांगली होते आहे आणि शेती कामेही काही प्रमाणात पूर्ण झाली आहेत. मात्र कमी पावसामुळे शेतात खत टाकण्याचे काम सुरू करण्यात दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे.
मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दमदार वळीवाच्या आगमनानंतर शेतकऱ्यांनी शिवारात मशागत करून कामे पुरी केली होती. वेळेत धुळवाफ पेरणीचे कामही पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी बरीच धडपड केली होती. त्यानंतर मृगाच्या वेळी दोन दिवस पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर पावसाने दिलेली ओढ शेतकऱ्यांना चिंता करण्यासाठीचीच. मात्र आता मागील दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र पुन्हा पाऊस गायब तर होणार नाही ना? असा प्रश्न शेतकऱ्यांना काळजीत टाकणारा ठरला आहे.
काही भागात रोपण करण्यात येणार आहे. मात्र पाऊस अधिक नसल्यामुळे ही रोप लागवड कशी करावी? त्यातच म्हणावा तसा पाऊस पडत नसल्याने विहिरींनाही पाणी कमी प्रमाणात उपलब्ध आहे. शेतात रोप लागवड साठी मोठ्या पावसाची गरज असते. त्यामुळे शेतकरी आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
पावसाची गाऱ्हाणी गावोगावी झाली आहेत. पाऊस पडावा यासाठी देवाचा धावाही झाला आहे. आत्ता तो पडू लागलाय तो तसाच पडत राहावा हीच एकमेव इच्छा शेतकऱ्याला आहे.