तहसीलदार कार्यालयात चाललेल्या भ्रष्टाचार विरुद्ध सामाजिक संस्था आवाज उठवणार आहेत.तहसीलदार कार्यालयातील भूमी आणि कागदपत्र संकलित विभागात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांची गैरसोय झाली आहे. याबाबत जोरदार आवाज उठविण्यासाठी भ्रष्टाचार निर्मुलन सामाजिक संस्था आवाज उठविणार आहे.
तहसीलदार कार्यालयात भूमी विभाग म्हणजे त्याठिकाणी वारसा, संमती, खरेदी, हक्कपत्र यासह इतर जमिनीची नाव चढविणे, कमी करणे अशी कामे होत असतात. नवीन कायद्यानुसार 45 दिवसांच्या आत नावे चढविणे आणि कमी करणे आवश्यक आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून पैसे मागण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.
सर्व सामान्य शेतकरी आणि नागरिक या कार्यालयात येत असतात. मात्र काही वर्षांपासून सादर कार्यालय म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे. सदर कार्यालयाचे शिरस्तेदार पासून सारेच जण कामासाठी आलेल्या लोकांची छळवणूक करत असल्याचा आरोप या भ्रष्टाचार निर्मुलन संस्थेने केला आहे.
या कार्यालयात जाण्यासाठी सर्व सामान्य घाबरत आहेत. तेथे होणारी पिळवणूक व पैशासाठी अडवणूक ही नागरिकांची मुख्य डोके दुखी बनत चालली आहे. अनेकांना कागद नाही म्हणून होणारी छळवणूक व नंतर तो कागद नाही म्हणून त्या अर्जाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या कामात गैरव्यवहार होत आहे. या मनमानी कारभार विरोधात जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आवाज उठविण्यात येणार आहे, अशी माहिती भ्रष्टाचार निर्मुलन सामाजिक संस्थेतर्फ़े वकील नामदेव मोरे यांनी दिली आहे.