टिळकवाडी गोवावेस मधील दत्त मंदिरासमोरील शांताप्पाण्णा मिरजी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेत चोरीचा प्रयत्न झाला. चोरट्यांनी शटर उचकटून आतील बाजूस असलेला काचेचा दरवाजा फोडून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु फुटलेल्या काचा त्यांना लागल्याने ते परत निघून गेले.
बाजूला असलेल्या प्लायवूडच्या दुकानाचे शटरही उचकटण्याचा प्रयत्न चोरट्यानी केला आहे. या दोन्ही घटना आज सकाळी साडेआठ वाजता उघडकीस आल्या. गोवावेसला शांताप्पाण्णा मिरजी अर्बन को-ऑपरेटिव्ह लिमिटेड बँकेची शाखा आहे. आज सकाळी येथून येणाऱ्या जाणाऱ्यांना बँकेचे शटर काही फूट उघडे असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी ही माहिती पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा याठिकाणी शटर उचकटून चोरीचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला.
चोरट्यांनी शटर वरती करून आतील बाजूस असलेल्या अर्ध्या भिंतीच्या आतील काचेचा दरवाजा फोडला. त्यातून आत जाण्याचा प्रयत्न करताना बहुदा चोरट्यांना काचा लागल्या असाव्यात. कारण त्या ठिकाणी रक्त पडल्याचे दिसून येते. त्यामुळे चोरट्यांनी तेथून काढता पाय घेतला. याच्याच खालील बाजूला प्लायवूडचे नव्याने दुकान होत आहे. याचेही शटर उचकटण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला आह. घटनेची माहिती मिळताच गुन्हे विभागाचे डीसीपी महानिंग नंदगावी टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक मौनेश देशनुर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.