शहरातील भंगीबोळ याची सुधारणा करण्यासाठी मनपा अनेक उपक्रम राबविण्यात गुंतली असतानाच नागरिकांना मात्र याबाबत स्वच्छता राखण्यास दुर्लक्ष केले जात आहे. कचरा आणि इतर काही वस्तू टाकून स्वच्छ भंगीबोळचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरातील भंगीबोळ किती स्वच्छ आणि किती अस्वच्छ हा प्रश्न निर्माण झाला आहे.
बेळगाव महानगर पालिकेच्या प्रयत्नातून भंगीबोळात पेव्हर्स बसविण्याचे हाती घेण्यात आले. शहरातील तसेच उपनगरातील अनेक भंगीबोळ चकाचक करण्यात आले. मात्र नागरिकांची मानसिकता बद्दलण्यास त्यांना अपयश आले आहे. अनेक भंगीबोळात रंगरंगोटी करून येथे कचरा टाकू नये, असे फलकही लावण्यात आले. मात्र त्याकडे कोणाचे लक्षच राहिले नाही.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत स्वच्छ करण्यासाठी हातात स्वतः झाडू घेऊन रस्त्यावर उतरले. मात्र नागरिकांनी त्याला स्टंट म्हणून दुर्लक्ष केले. तर मनपाने हीच मोहीम यशस्वी होण्यासाठी विविध क्लुप्त्या लढविल्या मात्र नागरिकांनी त्याला वाटण्याचा अक्षता लावल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे स्वच्छ बेळगाव सुंदर बेळगावचे स्वप्न धूसर होत आहे.
मनपाने शहरातील आणि इतर ठिकाणातील भंगीबोळात स्वच्छता अभियान राबवून पेव्हर्स घालून स्वच्छता राखावी असे सांगितले होते. मात्र भंगीबोळ स्वच्छ केल्यानंतरही नागरिकांनी येथे कचरा टाकण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. ही भंगीबोळ स्वच्छ ठेवण्यासाठी मनपाच्या वतीने जागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी याबाबत सतर्क राहून कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावून भंगीबोळ स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे भंगीबोळ किती स्वच्छ आणि किती अस्वच्छ हा प्रश्न तसाच आहे.