किडनीच्या विकाराने आजारी असलेल्या गरजू आणि गरीब रुग्णांसाठी लायन्स क्लब ऑफ शहापुरने शहापूर लायन डायलिसिस सेंटर सुरु केले असल्याची माहिती शहापूर लायन्स चॅरिटेबल फाऊंडेशनचे अध्यक्ष विजयकुमार हेडा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
किडनीच्या आजारामुळे अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो.त्यामुळे कमीतकमी खर्चात डायलिसिस सेंटरमध्ये डायलिसिस करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.सध्या हिंदवाडी येथील डायलिसीस सेंटरमध्ये पाच डायलिसिस मशीन आहेत.अनेक दानशूर व्यक्तींनी हे डायलिसिस सेंटर उभारण्यासाठी सढळ हस्ते मदत केली आहे.डायलिसिस सेंटरची जागा गोमटेश विद्यापीठाचे अधिष्ठाता आणि माजी आमदार संजय पाटील यांनी उपलब्ध करून दिली आहे.वेणूग्राम हॉस्पिटलचे सहकार्य सेंटरसाठी लाभले आहे.एक डॉक्टर,तंत्रज्ञ आणि वार्ड बॉय असा स्टाफ येथे सेवेला आहे.गरजू रुग्णांनी या डायलिसिस सेंटरचा लाभ घ्यावा असे आवाहन विजयकुमार हेडा यांनी केले.
पत्रकार परिषदेला माजी आमदार संजय पाटील,डॉ.श्रीहरी पिसे,फाऊंडेशनचे सचिव चार्टर्ड अकौंटंट संजीव अध्यापक आणि लायन्सचे पदाधिकारी उपस्थित होते.