वाहन चालविताना नियमांचे पालन न करणाऱ्या १०४४ जणांवर एका दिवसात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. बेळगाव पोलीस आयुक्त डॉ डी सी राजप्पा यांनी काल रविवार दि १ जुलै रोजी शहर भर पथके स्थापून ही कारवाई केली आहे.
या कारवाईत १ लाख ६ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मागील सहा महिन्यात झालेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. रविवारी दुपारी ते रात्री ९ पर्यंत शहरातील सर्व चौक आणि प्रमुख मार्गावर ही कारवाई झाली आहे.
वाहन चालवताना मोबाईल वर बोलणाऱ्या २१८ जणांना या कारवाईस सामना करावा लागला आहे. त्यांना दंड भरावा लागला. वाहन चालवत असताना कृपा करून मोबाईल फोन चा वापर करू नका, यामुळे अपघात घडतो याची नोंद घ्या असे आवाहनही पोलीस आयुक्तांनी केले आहे.
बाकीच्या कारवाईत वाहन चालवताना हेल्मेट न वापरणे, विना परवाना वाहन चालवणे, वाहनांची कागदपत्रे जवळ न ठेवणे या तसेच इतर अनेक चुकांचा समावेश आहे. वाहन प्रदूषण नियंत्रित आहे याचे प्रमाणपत्र नसलेल्या लोकांवर सुद्धा पोलिसदल कारवाई करत आहे.
नागरिकांनी वाहन चालवत असताना या चुका होणार नाहीत या गोष्टीकडे प्रामाणिकपणे लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा दंड स्वरूपात पैसे भरण्याची वेळ येत आहे. पोलीस दलाने मोटार वाहन नियम पाळा असे आवाहन करून देखील बरेच जण हे नियम पाळत नाहीत असे लक्षात आले यामुळे ही कारवाई करणे भाग पडले. एक दोन दिवसात सगळे नियम पाळणार नाहीत, त्यामुळे आता अधून मधून अशी कारवाई केली जाणार आहे. दंडाची भीती निर्माण झाल्यास हे प्रकार थांबतील नाहीतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या असे चित्र होणार आहे.
विधानसभा निवडणूक पूर्व काळात वाहन नियमांची काटेकोर आंमलबजावणी करण्यात येत होती पण मध्यंतरी यात शिथिलता आली होती.