Monday, November 18, 2024

/

‘इसब’-लागण आणि उपचार वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

ECzimaइसब हा एक वैशिष्ठ्यपूर्ण त्वचारोग आहे. एक्झिमा हा एक ग्रीक शब्द असून त्याचा अर्थ उकळणे असा होतो. आणि खरोखरच त्वचेवर तसेच फोड, खाज लालसरपणा जाणवत राहतो. इसब हा अ‍ॅलर्जी प्रकारात मोडणारा आजार आहे. इसब याचे दुसरे नाव त्वचादाह असेही आहे.
कारणे : इसब होण्यासाठी दोन प्रकारची कारणे असू शकतात.
शरीरांतर्गत : शरीरांतर्गत कारण हे अनुवांशिक असू शकते. ही एक़ प्रकारची अ‍ॅलर्जी एका पिढीतून दुसर्‍या पिढीत संक्रमित होते. ती सर्दी, पित्तगांधी, दमा (अस्थमा) किंवा इसब या आजारांमध्ये रुपांतरीत होत राहते. प्रत्येक पिढीत यातील कोणता ना कोणा तरी विकार आढळून येतो.

 

शरीरबाह्य : शरीरबाह्य कारणं अनेक असू शकतात. हे अ‍ॅलर्जी तयार करणारे घटक शरीराच्या (त्वचेच्या संपर्कात आल्यामुळे इसब उद्भवते)
उदा. त्वचा दाह करणार्‍या घटकांमुळे (साबण, डिटर्जंट्स, आम्ल, अल्कळी, इंडस्ट्रीयल केमिकल्स इ.)
2) रोजच्या वापरातील घटकांमुळे (काही वनस्पती, सौंदर्यप्रसाधने, कपडे, मलम, खडू, पेन्सील, खोटे दागिने, कपड्यांच्या बटनांमळे, सिमेंट, चामडे, चप्पल, रबर, हेअरडाय, अत्तरं, रेझीनचे गोंद इ.च्या वापरामुळे) इसब होऊ शकतो.
3) हवामानातील घटक उदा. सूर्यकिरणांमुळे, अतिथंड हवामानामुळे, अति उष्ण हवेमुळे इसब होऊ शकतो.
अतिशय मानसिक त्रास व तणाव यामुळेही इसब उद्भवते.
लक्षणे : एक्झिमा हा अ‍ॅक्यूट आणि क्रॉनिक असा दोन्ही स्वरपाचा असू शकतो. प्रथमत: त्वचा लाल होऊन बारीक मोठे पुरळ येतात. साधारण खाज पडते. हळूहळू हे फोड मोठे होतात. त्वचा फुगते व त्वचा अनेक फोडांनी भरुन जाते. जाड झालेली त्वचा, फोडांवरची सालं जाणे, पातळ द्रव पाझरणे, खपल्या धरणे, खपल्या निघणे असे एक दुष्टचक्र सुरु होते. त्वचा अत्यंत कुरुप दिसते. सतत खाज येणे हे महत्त्वाचे लक्षण असते. काहीवेळा इसब फक्त एखाद्या भागापुरतेच मर्यादित असते तर काहीवेळा शरीराच्या अन्य अवयवांवरही पसरते. इसब वर्षानुवर्षे राहते. इसबाबरोबर व्यक्तीला दमा, पित्तगांधी यांचाही त्रास असू शकतो.
उपचार : इसब हा व्यक्तीच्या मूळ प्रवृत्तीचा दोष असल्या कारणाने त्यावर कोणतेही उपचार करताना सांभाळूनच करावे लागतात. इतर कोणतेही उपचार घेऊन वरवर हा आजार बरा झाल्यासारखा भासतो. परंतु थोड्या दिवसांनी पुन्हा मूळस्वरुप धारण करतो. यासाठी संपूर्ण उपचारासाठी होमिओपॅथिक शास्त्राचीच मदत घ्यावी लागते. या औषधांमुळे या आजाराचे समूळ उच्चाटन करता येते. व्यक्तीची अ‍ॅलर्जीची प्रवृत्ती नाहीशी करुन त्वचेवरील लक्षणांचे उपचार केल्याने दुहरे फायदा होतो. इसब असणार्‍या दोन व्यक्तींची लक्षणे एकसारखी असत नाहीत. येणारे फोड, खपल्यासुद्धासारख्या दिसत नाहीत. म्हणूनचज व्यक्तिवैशिष्ट्यांचा अभ्यास करुन औषध देण्यात येणारे होमिओपॅथिक शास्त्रच अशा विकारांमध्ये जास्त उपयुक्त होते. पाहूया अशाच काही होमिओपॅथिक औषधांची माहिती.
सिकुटा व्हायरोसा : चेहरा व डोक्यावर फोड येतात. त्यावर पिवळट रंगाच्या खपल्या धरतात. चेहरा व डोक्यावरील इसबावर उपयुक्त औषध. अतिजहाल स्ट्राँग औषधे घेतल्यावर इसब दाबले जाऊन रुग्णाला झटके येऊ लागतात. अशावेळी हे औषध मूळ रोग बरा करुन झटकेसुद्धा थांबवते.
क्रोटॉनटिग : त्वचारोगावर हे प्रमुख औषधांपैकी एक आहे. सार्‍या शरीराला असह्य खाज सुटते. त्वचा हळुहळी होते. हलक्या हाताने खाजवल्यास बरे वाटते. सर्व शरीरभर इसब आढळतो. जननेंद्रियांवर जास्त प्रमाणात खाज असते. या फोडामध्ये इन्फेक्शनने पूसुद्धा होतो. गळू नखुर्डे, चिखल्या, रक्त साकळणे यावरही हे औषध उपयुक्त आहे.
पेट्रोलियम : हिवाळ्यात त्रासदायक वाटणार्‍या सर्व प्रकारच्या शुष्क त्वचारोगांवर हे औषध विशेष उपयुक्त आहे. तळहामावरील इसब, गुदद्वार, कानाच्या आती इसब यावर गुणकारी. या इसबात लहान फोड एकत्रित होऊन फुटतात. त्यावर एकच खपली धरते. त्यातून स्त्राव वाहतो. हाताच्या बोटाची टोके खरखरीत होऊन कात्रे पडतात.
सल्फर, सोरिनम, रसटॉक्स, सेपिआ, स्टेफिसॅग्रीया, अर्सेनिक अल्ब, पल्सेटिला, एपिस अशा अनेक औषधांचा इसब या विकारात वापर करता येतो. त्यासाठी रुग्णाच्या व्यक्तिवैशिष्ठ्यांच्या जाणीवपूर्वक अभ्यास करावा लागतो. याकरिता होमिओपॅथिक तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते. कारण होमिओपॅथिक एक शास्त्र असून या शास्त्राचा अभ्यासक्रमातून अभ्यास केलेल्या तज्ञांकडून उपचार घेणे आवश्यक असते. फक्त औषधांची माहिती वाचून स्वत: उपचार करणे तर्कसंगत नाही.
इतर : रुग्णाने शारीरिक स्वच्छता ठेवणे अनावश्यक असते. हा विकार संसर्गजन्य नाही. परंतु अस्वच्छतेमुळे रुग्णालाच त्याचा जास्त त्रास होऊ शकतो. ज्या वस्तूंपासून त्वचा दाह होतो त्या वस्तूंचा संपर्क टाळावा. मन प्रसन्न ठेवण्यासाठी प्राणायाम, योगासनांची मदत घ्यावी.

Dr sonali sarnobatडॉ सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक :9916106896
सरनोबत क्लिनिक :9964946818

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.