वट पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी बेंदर हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे वड पौर्णिमेचा सण साजरा झाला की बेंदूर येतो. त्यामुळे प्रथेप्रमाणे बेळगाव जिल्ह्यात सर्वत्र हा सण साजरा होत आहे.
बळीराजाचा सखा असलेला आणि कृषीप्रधान भारत देशात प्रचंड महत्व असलेल्या बैलांच्या प्रती आदरभाव व्यक्त करण्याचा हा सण आहे. त्यामुळे सकाळपासूनच विविध गावात बैलांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.निपाणी भागात या सणाला बेंदूर कोल्हापूर भागात कर्नाटकी बेंदूर तर बेळगाव जवळच्या पश्चिम भागात याला बेंदर असे म्हटलं जाते.
सकाळच्या प्रहरात बैलांना न्हाऊ माखू घालून, आकर्षक रंगरंगोटी, त्यांना सजवून बँड, हालगी, कैताळ आणि घुमक्याच्या तालावर ही मिरवणूक काढण्यात येते. निपाणी जवळील शिरगुप्पी येथे बेंदर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय.गेले तीन वर्षे निपाणी भागात पोलीस निरीक्षक म्हणून सेवा बजावत असलेले किशोर भरणी यांचा शिरगुप्पी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
‘शेतकऱ्याचा बैल आणि गरिबाची बायको आजारी पडू नये’ अशी एक ग्रामीण म्हण आहे. यावरूनच शेतकऱ्यासाठी बैल किती महत्वाचा व अनिवार्य आहे हे समजेल. बैलाचे शेतकऱ्यावरती अनंत उपकार असतात व हे तो आयुष्यभर फेडू शकत नाही म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा अत्यंत आत्मियतेने साजरा केला जातो.
पोळ्याच्या दिवशी बैलांना न्हाऊ घालतात. पंचारती ओवाळतात. पुरणपोळ्यांचा नैवद्य दाखवितात. शिंगाना हिंगूळ वं बेगड लावतात. गळ्यात सुंदर माळा वं पायात घुंगरूदेखील बांधतात. संपूर्ण शरीरावर सुंदर नक्षीकाम करतात. पाठीवर रंगीबेरंगी झुल टाकतात. एखाद्या नव्या नवरीच्यावर त्याचा शृंगार करतात. आपले हे अनोखे रूप बघून बैलदेखील उत्साहाने खुलतात. एवढे सगळे करून झाल्यावर त्यांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढतात. आपला बैल हा प्रत्येक शेतकऱ्याचा अभिमान असतो. आपल्या सख्या भावाप्रमाणे बैलावर प्रेम केले जाते.