आज पुन्हा एक अपघात झाला आणि तीन कोवळ्या तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. वाहन चालवण्याची योग्य जाण नसलेली तरुण मुले आणि मुली दुर्दैवाने गमवावी लागली आहेत. एक दोन दिवस दुःख व्यक्त करून सगळेच विसरतात आणि परत पुढील अपघात होई पर्यंत काहीच होत नाही. ठोस आणि पक्का निर्णय घेऊन आपल्या मुलांची जबाबदारी वाचवण्याची गरज आता पालकांनी लक्षात घ्यावी.
आपला मुलगा किंव्हा मुलगी कमी वयात गाडी चालवायला शिकला याचे कौतुक वाटून घेणाऱ्या पालकांनी आता जागृत झाले पाहिजे. मोकळ्या मैदानावर किंव्हा खुल्या रस्त्यावर आपल्या मुलांना गाडी चालवायला नक्की शिकवा पण त्यांच्याच जबाबदारीवर त्यांना गाडी देऊन मोकळे होऊ नका हे माध्यमांनी कितीवेळा सांगायचे? पुन्हा पुन्हा दुर्दैवी घटना घडली की दुःख व्यक्त करीतच राहायचे का? पालक कधी शहाणे होणार आहेत?
कोणालाही १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय गाडी चालवण्याची परवानगीच नाही. वाहतूक खात्याने तसा नियमच केला आहे. पण हा नियम ऐकणार कोण? दहावीत चांगले मार्क घेतलेस की तुला गाडी देतो असे सांगून पालक मोकळे होतात. भर रहदारीच्या रस्त्यावरून गाडी चालवण्याची आपला मुलगा किंव्हा मुलीची क्षमता तरी आहे काय हे ते पाहत नाहीत. दिलेले वचन पूर्ण केले याचा आनंद त्यांना असतो, पण आपण चुकीचे वचन दिले याचे भान त्यांना कधी येणार?
परवाना मिळाला नाही तरी कॉलेज आणि ट्युशन ला आपला तरुण मुलगा किंव्हा मुलगी गाडी घेऊन जातो हे कसे काय चालते? तुम्ही कितीही श्रीमंत असा, पण बस चा पास काढून देऊन मुलाच्या सुरक्षित प्रवासकडे लक्ष द्यायचे सोडून त्याच्या अपघाताची तयारी तुम्ही कशी काय करता? लक्ष देऊन विचार करायची वेळ आहे.
पावसाळा सुरू झाला की तरुण मुले मुली सुट्टीच्या दिवशी मोटर बाईक वरून बाहेर जायचा हट्ट करतात. पण त्यांना जाऊ द्यावे की नाही, आणि जायचेच असेल तर ते सुरक्षित कसे जातील याचा विचार पालकांनी करायला नको का?
सहलीचा मूड असेल तर तिघा चौघांना पैसे काढून चांगली गाडी करून द्या, पण असे त्यांना एकटे एकटे बाईक वरून पाठवून काय होणार? त्यांच्या मृत्यूने झालेली हानी भरून काढता येईल काय?
लहान पणा पासून काळजीने वाढवलेली मुले अशी कोवळ्या वयात गेली तर त्या पालकांची अवस्था काय होते याचा विचार करा.
चला ठरवून द्या, अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत आपल्या मुलांना गाडी देऊ नका, त्यांनी हट्ट केला तर समजावून सांगा, ऐकतच नसतील तर सणसणीत थोबाड रंगवा, कॉलेजांनी लायसन्स नसलेल्या मुलांना गाडी घेऊन आल्यास परवानगीच देऊ नका आत घेऊ नका आणि पोलिसांनो कायदा काय आहे माहीत नाही. अशी मुले गाडी चालवत असतील तर अडवा आणि त्यांच्या गाड्या जप्त करून टाका, तसे झाले तरच जीव वाचतील.
बेळगाव live हे आवाहन करत आहे. ज्यांची मुले दगावली त्यांना दोष देणे हा हेतू या लेखनात अजिबात नाही. त्यांना किती दुःख झाले असेल याची कल्पना आहे, पण बाकीच्या पालकांवर अशी दुःखद वेळ येऊ नव्हे म्हणून आत्ताच कठोर व्हावे लागेल.
या खबरदारीच्या उपायांना समर्थन देणाऱ्यांनी कृपा करून ही पोस्ट प्रत्येक पालकांपर्यंत पोहोचवा, आपले कॉमेंट करा आणि चला कोवळ्या मुलांचे जीव वाचवूया.