कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार आणि पुरोगामी विचारांच्या नेत्या गौरी लंकेश यांची हत्या करण्याचा कट बेळगाव येथेच शिजल्याचा अंदाज आहे. यासाठी या हत्याप्रकरणातील आरोपी
परशुराम वाघमारे याला घेऊन एस आय टी चे पथक बेळगावला आले आहे. बेळगाववर एस आय टी ची नजर घोंघावत असून संपूर्ण शहर आणि परिसर एस आय टी च्या रडारवर आहे.
गौरी लंकेश यांची हत्या आपणच केली आणि यासाठी बंदूक चालवण्यासाठी बेळगाव येथे प्रशिक्षण घेतले अशी कबुली अटकेतील आरोपी परशुराम याने दिली. यावरून एस आय टी च्या अधिकाऱ्यांना बेळगाव आणि परिसरातील काही हिंदुत्ववादी संघटनांवर संशय आहे. याबद्दल तपास करण्यासाठी ते दाखल झाले असून अतिशय गुप्तपणे तपास सुरू आहे.
स्वतः हत्येची कबुली दिलेला परशराम ज्या संघटनेशी संबंधात आहे त्या संघटनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांवर बारीक नजर ठेवण्यात आली आहे. त्यांच्या हालचाली, व्यवहार आणि इतर गोष्टी तसेच शस्त्रास्त्रे आणण्याचे मार्ग याचासुद्धा शोध घेण्यात येत आहे.
नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम एम कलबुर्गी आणि गौरी लंकेश या पुरोगामी विचारधारेतील व्यक्तींच्या एकामागोमाग हत्या झाल्या. यामध्ये कलबुर्गी व लंकेश हे कर्नाटकातील असल्याने कर्नाटक सरकारने स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम अर्थात एस आय टी स्थापन केली. या पथकाने सिंदगी येथून ११ जून रोजी परशराम वाघमारे याला अटक केली आहे. अटकेनंतर त्याने दिलेल्या जबानीत आपण केलेली हत्या कबूल केली आहे. हत्येपूर्वी त्याचे वास्तव्य बेळगाव भागात होते असे त्याने सांगितल्याने पोलीस अधिक मोठ्या प्रमाणात कामाला लागले आहेत.
Trending Now