लेखा स्थायी समितीच्या अध्यक्षा सरला हेरेकर यानी सदस्यांनाच ‘लक्ष्य’ केल्यामुळे आज महापालिकेच्या लेखा स्थायी समितीची बैठक वादळी झाली. काही सदस्यांनी बहिष्कार टाकल्यामुळे लेखा स्थायी समितीच्या पहिल्या तीन बैठका तहकूब कराव्या लागल्या होत्या. गुरुवारच्या बैठकीत अध्यक्षा हेरेकर यानी हा विषय उपस्थित केला. ज्या सदस्यांमुळे बैठक तहकूब करावी लागली होती त्यांना पुन्हा स्थायी समितीमध्ये स्थान देवू नये अशी भूमिका त्यांनी घेतली.
त्यांच्या या भूमिकेला विरोधी गटनेते दीपक जमखंडी यानी पाठिंबा दिला. हेरेकर व जमखंडी यांची भूमिका चुकीची आहे. काही सदस्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. असा आरोप किरण सायनाक व रतन मासेकर यानी केला. यावरून हेरेकर, जमखंडी, सायनाक व मासेकर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. सायनाक व मासेकर यानी सभात्याग करण्याचा निर्णय घेतला. त्यावर बैठकीला गैरहजर असलेले फईम नाईकवाडी व मैनाबाई चौगुले यांच्याबद्दल आपण बोलल्याचे हेरेकर म्हणाल्या.
अधिकारी व काही सदस्यांमुळे वर्षभरात लेखा स्थायी समितीच्या बैठका झाल्या नाहीत. त्यामुळे आपण असे बोलल्याचे स्पष्टीकरण हेरेकर यानी दिले. कोणावर वैयक्तिक टीका केली नाही असे सांगत कोणाच्या भावना दुखावल्यास माफी मागण्यास तयार असल्याचे हेरेकर म्हणाल्या. जमखंडी यांनीही सायनाक व मासेकर यांची समजूत काढल्यावर त्यानी सभात्याग करण्याचा निर्णय मागे घेतला, त्यामुळे बैठक पुन्हा सुरू झाली. पण बैठक सुरू झाल्यावर हेरेकर वर्षभरात लेखा स्थायी समितीच्या बैठका न झाल्याचा मुद्दा वारंवार उपस्थित करत राहिल्या. त्यामुळे हेरेकर याच विषयांतर करत असल्याचा आरोप सदस्यांकडून होत आहे.