भाजपला संख्याबळ सिद्ध करता आले नाही, काँग्रेसला जास्त संख्या हातात असूनही सरकारचा झेंडा जेडीएस च्या हातात द्यावा लागला, मंत्रिमंडळ विस्तारावरून जे काही सुरू आहे याची उजळणी सर्व माध्यमे रोज करीत आहेत. आता प्रश्न निर्माण झालाय एकूण नाराजीनाम्यात कर्नाटकातील युतीचे सरकार टिकणार काय हा?
राज्यात काय चाललंय ते तर सगळ्यांना माहीतच आहे. आपल्या जिल्ह्यात झालेल्या राजकारणानेही संपूर्ण राज्याला आणि कर्नाटकातील युती सरकारला मोठे हादरे दिले आहेत. अक्का विरुद्ध आण्णा च्या राजकारणात मंत्रिपद दावणीला बांधले जात आहे.
काँग्रेस मध्ये अक्का अर्थात लक्ष्मी हेब्बाळकर यांचे वजन जास्त आहे. पण स्वतःचे मंत्रिपद मिळवणे टाळून त्यांनी रमेश जारकीहोळी यांना मंत्रिपद मिळवून देण्यात पुढाकार घेतला. राजकीय वर्तुळात असे बोलले जात आहे की सतीश जारकीहोळी यांना मंत्रिपद मिळू नव्हे म्हणून त्यांनी ही चाल खेळली. यामुळे रमेश यांचे भाऊ आणि एकाच पक्षातले असले तरी एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले सतीश जारकीहोळी नाराज झाले आहेत. आपली नाराजी त्यांनी कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या द्वारे उघड केली असून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव असलेले सतीश दुसऱ्या पक्षात म्हणजेच भाजप मध्ये जाण्याच्या तयारीत आहेत.
हे असे होत राहिले तर काँग्रेसचे मंत्रिपद मिळालेले एकामागून एक आमदार राजीनामा देऊ लागतील व पोटनिवडणुका घ्याव्या लागतील अशी वेळ येण्याची शक्यता आहे.
अक्का विरुद्ध अण्णा हा वाद नवीन नाही. मागील सरकारमध्येही अककांनी वजन वापरून सतीश यांना पालकमंत्री पदावरून बाजूला करून रमेश यांच्या गळ्यात माळ घातली होती. दोन भावांचा वर्चस्व वाद आणि त्यात अककांची महत्वाची भूमिका याची सध्या चर्चा सुरू आहे.