देश भर फिरणारी इस्कॉनची पदयात्रा गुरूवारी बेळगाव नगरीत दाखल झाली असून तब्बल 9 वर्षानंतर या पदयात्रेचे आगमन बेळगाव नगरीत झाले आहे अशी माहिती बेळगाव इस्कॉन मंदिर प्रमुख भक्ती रसामृतस्वामी महाराजानी दिली आहे.
इस्कॉन मंदिर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भक्ती रसामृतस्वामी महाराज बोलत होते. ते म्हणाले, भगवन्नामाचा आणि वैदिक ग्रंथांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी 35 वर्षांपूर्वी या पदायात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. या पदयात्रेत सुमारे 40 इस्कॉन भाविकांचा समावेश असून भाविकांची ही तुकडी बैलगाडीत गौरनिताई आणि श्रीमद प्रभूपाद यांच्या मूर्तीसह संकीर्तन, भजन,प्रसाद वितरण करीत गावोगावी भ्रमण करते. या यात्रेचे बेळगाव नगरीत दुसऱ्यांदा आगमन झाले आहे.
विविध ठिकाणी भ्रमण करीत खानापूर मार्गे बेळगावमध्ये दाखल झालेली ही पदयात्रा तीन दिवस नगरात मुक्काम करणार असून हे तीन दिवस पदयात्रा शहरात संचार करणार आहे, असे सांगत या पदयात्रेचा लाभ बेळगावकरांनी घ्यावा असे, भक्ती रसामृतस्वामी महाराज म्हणाले.
पदायात्रेचे प्रमुख आचार्य महाराज यांनी, पदयात्रेचे महत्व, यात्रेदरम्यानचे अनुभव कथन केले. शुक्रवारी सायंकाळी महाद्वार रोड परिसर, शनिवारी सायंकाळी धर्मवीर संभाजी चौक परिसर तर रविवारी सायंकाळी अनगोळ भागात पदयात्रेचा संचार राहणार असून सोमवारी ही यात्रा नगरातून निपाणी, कोल्हापूर मार्गे पंढरपूरकडे रवाना होणार आहे, असे सांगितले.
पदयात्रेत नरसिंह, नंदकिशोर, कालिया, जय व कृष्ण हे बैल भाविकांचे लक्ष सहजपणे वेधून घेतात. नरसिंह हा बैल यात्रेत तब्बल 12 तर नंदकिशोर हा बैल 10 वर्षांपासून सहभागी आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.