दुष्काळी परिस्थिती निवारण्यासाठी झाडे लावा आणि देश वाचवाचा नारा देण्यात आला आहे.मात्र झाडे लावली आणि आपली जबाबदारी संपली असेच काहीसे चित्र सध्या दिसून येत आहे. मात्र वन खाते आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
वन खाते दरवर्षी उद्दिष्ट पूर्तीसाठी आटोकाट प्रयत्न करते. महिना दोन महिन्यात उद्दिष्ट पूर्णही करते. मात्र पुढे काय? हा प्रश्न तसाच राहतो. उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी जी धडपड करण्यात येते तीच धडपड झाडे जगवण्यासाठी केल्यास खरंच पर्यावरणाचा समतोल राखण्यास वनखाते यशस्वी होतील असे वाटते.
वन खात्याने मागील वर्षी ४० हजारांचे उद्दिष्ट पूर्ण केले. याचा गवगवाही मोठया प्रमाणात करण्यात आला. मात्र ४० हजार झाडांपैकी किती झाडे जगली व ती जगविण्यासाठी किती प्रयत्न झाले? याचा विचार करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. पावसाळा जवळ आला की पुन्हा उद्दिष्ट्य. त्यामुळे उद्दिष्ट् पेक्षा झाडे जगविण्याची कृती हवी, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
दरवर्षी विविध संघ संस्था मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याची मोहीम राबवितात मात्र ती जगविण्यासाठी मोजक्याच संघटनांनी पुढाकार घेतल्यास चांगले आहे. मात्र यावर्षी सर्वांनी एकच झाड लावा पण ते जगविण्यासाठी प्रयत्न करा , असे आवाहन बेळगाव लाइव्हच्या माध्यमातून करावेसे वाटते.