विधान सभा निवडणुकीत खानापूर,बेळगाव दक्षिण आणि ग्रामीण मतदारसंघात मराठी माणसाने राष्ट्रीय पक्षाना भरभरून मतदान केले आहे. बेकी या प्रमुख कारणाला कंटाळलेल्या जनतेने हा कौल दिला आहे. आता वेळ सुरू झाली आहे उपदेशाची.
पराभूत झालेले समिती उमेदवार आणि समिती नेत्यांकडून जनतेला अनेक उपदेश दिले जात आहेत .जनतेवर टीका केली जात आहे . मतांसाठी कुक्कर आणि पैसे घेऊन विकले गेल्याचे आरोपही होताना दिसतात. ही टीका योग्य आहे का? अशी टीका करण्याचा नैतिक अधिकार किमान यापूर्वी पदे भोगलेल्या आणि वारंवार पदांची अपेक्षा करणाऱ्यांना आहे का? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे..
मराठी जनता गेली ६० ते ६२ वर्षे सीमाप्रश्नाच्या लढ्याशी प्रामाणिक राहून आपले योगदान देत आली आहे. कुणीही कितीही आमिषे दाखवली तरी समितीलाच मत हे रक्ता रक्तात भिनलेले होते आणि आजही आहे. अपवाद होऊन गेलेल्या निवडणुकीचा, केवळ याच निवडणुकीत कुक्कर , पैसे आणि साड्या दिलेल्या राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांना याच जनतेने विक्रमी मतांनी निवडून आणले. मी मी म्हणणाऱ्या समिती उमेदवारांचा दारुण पराभव केला. पदावर येऊन यापूर्वी फक्त आणि फक्त आपलीच पोटे भरून घेतलेल्या, राष्ट्रीय पक्षांशी संधान साधून बेकीचे राजकारण केलेल्या आणि प्रत्येक निवडणुकीत मीच पुढे म्हणणाऱ्या स्वार्थी नेते व उमेद्वाराद्दलचा हा उद्रेक म्हणता येईल.
हा उद्रेक तसा योग्यच आहे. भावनिक मुद्द्यावर मते देत आलेल्या या भोळ्या भाबड्या जनतेला साठ वर्षात समिती नेत्यांनी आणि विविध पदांवर निवडून आलेल्या उमेदवारांनी काय दिलं ? ग्रामपंचायत सदस्य ते आमदार झाल्यापर्यंत सगळेच पैसे ओढत राहिले. राज्यसभा निवडणूक ,एम एल सी निवडणूक, ए पी एम सी, महा पालिका निवडणूक पंचायत आणि लोकसभा निवडणुकीत पैसे खेचत राहिले. लोकसभा निवडणुकीत तर मोठाव्यवहार होतोय, लोकप्रतिनिधी म्हणून मते देताना किती कोटीचे व्यवहार होतील याचा नेमही नाही. समितीच्या जीवावर फुकटात निवडून येऊन गेली कित्येक वर्षे हेच चाललंय हे जनतेला माहीत नाही काय ? ते पैसे कधी जनतेला मदत म्हणून दिलाय का?कधी हुतात्म्यांच्या वारसांना मदत दिली का? हा देखील प्रश्न या उद्रेकाला कारण आहे.
गेली ६० वर्षे मराठी जनता प्रामाणिक आहे मात्र समितीचे लोकप्रतिनिधी विकले गेलेत. काही अपवाद वगळता त्यांनी दुकानदारी थाटलेली आहे. कोण कसा दुसऱ्याला निवडून आणण्यासाठी मागल्या दाराने पैसे आणतो हे जनतेने ओळखले आहे. कित्येक वर्षे पद मलाच हवीत मीच त्या पदावर राहणार उमेदवारी मलाच पाहिजेत हा अट्टहास कश्यासाठी?हे जनता सर्व पहात आहे. समितीच्या जीवावर पदे मिळवून आता राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणणारे विकाऊ राजकारणी जनतेच्या समोरच आहेत.
६० वर्षात सामान्य जनतेचं किती नुकसान झालंय आणि या नेत्यांच्या व उमेदवारांच्या घरचं किती नुकसान झालंय याचा आढावा कुणीतरी काढण्याची गरज आहे.
स्वतः पहिल्यांदा आरशात बघा आणि मगच समाजाला दोष द्या. जनता प्रामाणिक आहे. तीला दोष देण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही.जनतेच्या डोळ्यातलं आज कुसळ दिसायलंय, पण जनतेने तुमच्या डोळ्यातलं मुसळ बघितलंय त्याचं काय? नेतृत्व आणि उमेदवार बदल हाच एक पर्याय आहे .
दोन्ही गटातील नेत्यांनी आपली हेकेखोर वृृत्ती बाजूला सारून युवकांकडे नेतृत्व देणे गरजेचे आहे. नाहीतर समितीची पदे भोगून कुणी कुणी किती माया जमवली याचा हिशोब जनतेलाच मांडावा लागेल. वेळ गेली नाही शहाणे व्हा, अन्यथा समितीचं अस्तित्व संपुष्टात येईल.