भाजपचे सरकार बहुमत मिळू न शकल्याने कमी काळातच कोसळले आहे. यामुळे काँग्रेस आणि जेडीएस युतीच्या सरकार उभारणीस वाव मिळणार आहे. हे सरकार सत्तेवर आल्यास काँग्रेस पक्षातून आमदार झालेल्या बेळगावच्या कितीजणांना मंत्रिपद मिळणार? याची चर्चा जोराने सुरू झाली असून बेळगावचा पालकमंत्री कोण होणार ? याचीही चर्चा आहे.
बंगळूर येथून बेळगाव live ला मिळालेल्या संकेतानुसार माजी मंत्री आणि माजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्रिपद मिळण्याची शक्यता मोठी आहे. खानापूरच्या आमदार आणि काँग्रेस मध्ये मोठे वजन असलेले आय पी एस अधिकारी हेमंत निंबाळकर यांच्या पत्नी अंजलीताई निंबाळकर यांना अध्याप कोणते खाते मिळणार की नाही याबद्दल स्पष्टता नाही, तर माजी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्याबद्दल कोणता निर्णय घेतला जाणार हे सुद्धा स्पष्ट नाही.प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर या मोठी विक्रमी मते घेऊन विजयी झाल्या होत्या त्यामुळं महिला आणि बाल कल्याण खाते त्यांना मिळणार का याची देखील जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेस मध्ये राज्यात एकूण सात पैकी महिला काँग्रेस आमदार म्हणून निवडून आल्या आहेत त्यापैकी प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर, खानापूर मतदार संघातून अंजलीताई निंबाळकर, कोलार मधून माजी केंद्रीय मंत्री के एच मुनियप्पा यांच्या कन्या एम रुपकला तर गुलबर्गा उत्तर मधून कनिज फातिमा यांचा समावेश आहे.महिला कोट्यातून लक्ष्मी हेब्बाळकर यांना मंत्री पद मिळण्याची शक्यता दाट असून मराठा कोट्यातून अंजलीताई यांचा देखील विचार होऊ शकतो.
बेळगाव उत्तर, दक्षिण तसेच जिल्ह्यातल्या इतर ठिकाणी जेथे जेथे भाजपचे आमदार निवडून आले तेथे ते सरकार पडल्याने नाममात्र ठरणार आहेत तर तेथे पडलेल्या काँग्रेस आणि जेडीएस उमेदवारांना जास्त महत्व प्राप्त होणार आहे.
हे युतीचे सरकार कितीकाळ टिकेल यावर काँग्रेस आणि जेडीएस च्या आमदार व मंत्र्यांचे वर्चस्व टिकून राहू शकणार आहे. आता ही युती टिकवून ठेवण्याचे दिव्य यापुढील काळात राहणार आहे.