नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांनी कर्नाटकाचे २४ वे मुख्यमंत्री म्हणून काल शपथ घेतली आहे. बेंगळूरमधील राजभवनमध्ये आयोजित समारंभात राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुराप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ देवविली. येडियुराप्पा तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत. मात्र त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने उद्या दुपारी ४.३० पर्यंतची वेळ दिली आहे, ते बहुमत सिद्ध करू शकतील का? हा प्रश्न संपूर्ण राज्यात चर्चेत आहे.
राज्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला राज्यपालांनी सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले. त्यानुसार काल सकाळी ९ वाजता येडियुराप्पांचा शपथविधी समारंभ झाला. त्यांनी शेतकरी आणि ईश्वराचे नाव घेत शपथ घेतली. राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यानंतर राज्यपालांनी सत्ता स्थापनेचे आवाहन भाजपला केले. त्यामुळे विधिमंडळ नेतेपदी निवड झालेल्या येडियुराप्पांना सरकार स्थापनेची संधी मिळाली खरी पण, विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान पेलावे लागत आहे.
बहुमत सिद्ध झाल्यानंतर पूर्णप्रमाणात मंत्रिमंडळ रचना करण्याचा निर्णय येडियुराप्पा यांनी घेतला आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी येडिंना १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.पण याबद्दल विरोधी पक्षांनी सुप्रीम कोर्टात दावा दाखल केला असता तेथे उद्या पर्यंतची मुदत देण्यात आल्याने भाजप समोरील आव्हान वाढले आहे.
राज्याच्या मुख्य सचिव के. रत्नप्रभा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी येडियुराप्पांचे नाव पुकारताच राजभवनातील ग्लास हाऊसमध्ये जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या. शपथ ग्रहण करण्यासाठी व्यासपीठावर येताच येडियुराप्पांनी राज्यपालांसह उपस्थितांना हात जोडून नमस्कार केल्यानंतर विजयाचे संकेत दाखविले. शपथविधीनंतर राज्यपालांनी येडिंना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. कार्यक्रमप्रसंगी केंद्रीयमंत्री अनंतकुमार, सदानंदगौडा, जे. पी. नड्डा, प्रकाश जावडेकर, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, माजी उपमुख्यमंत्री आर. अशोक यांच्यासह पक्षातील प्रमुख नेते, आमदार उपस्थित होते.
शपथविधीनंतर नूतन मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी थेट विधानसौध मधील तिसऱ्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयात प्रवेश केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसाठी असणाऱ्या खुर्चीला हातजोडून नमस्कार करून आसनाधिन झाले.
येडियुराप्पांच्या शपथविधी समारंभासाठी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, एच. डी. कुमारस्वामी, व इतर नेत्यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, त्यांच्यापैकी कोणीही राजभवनाकडे फिरकले नाहीत. भाजपला सरकार स्थापनेची संधी दिल्यामुळे निजद काँग्रेस नेत्यांनी विधानसौध समोर धरणे आंदोलन छेडले
बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी आपल्याला १५ दिवसांची मुदत दिली आहे. मात्र, आपण तितका वेळ घेणार नाही. शक्य तितक्या लवकर बहुमत सिद्ध करेन. कोणत्याही क्षणी अधिवेशन बोलावेन. दोन-तीन तास अगोदर याविषयी कळवेन. त्यानंतर प्रत्येक आमदाराने बेंगळूरला दाखल व्हावे. असेही येडीयुरप्पा यांनी आत्मविश्वासाने सांगितले आहे. आता ते काय काय करतात याकडे देशाचे लक्ष लागले आहे.