अनगोळ विभाग एकीकरण समितीचे प्रमुख आणि कै सुरेश हुंदरे स्मृती मंचचे सदस्य आणि सीमाप्रश्नातील ज्येष्ठ नेते बी ए येतोजी यांनी आम्ही यावेळी अनगोळ चे सुपुत्र किरण सायनाक यांनाच निवडून देणार असे स्पष्टपणे सांगितले आहे.
गुरुवारी सकाळी शहर म ए समितीचे अध्यक्ष किरण ठाकूर यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी सायनाक यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले असता आपण सायनाक यांच्याच पाठीशी राहणार कारण ते आमच्या अनगोळ भागाचे सुपुत्र आहेत. असे त्यांनी यावेळी सांगितले.
किरण ठाकूर यांच्याशी आपले जुने संबंध आहेत.त्यांच्यासोबत आम्ही विविध आंदोलनात भाग घेतला आहे. किरण सायनाक हा तर आमच्या घरचा माणूस आहे. यामुळे त्यांना निवडून देणे महत्वाचे आहे असे सांगताना यावेळी १९८० सालाची पुनरावृत्ती होणार आहे कारण ८० साली किरण यांचे वडील कृष्णराव सायनाक हे महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीत उभे होते, तेंव्हाही अशीच स्थिती होती, पण आम्ही कृष्णराव यांच्याच मागे थांबलो होतो. यावेळीही किरण सायनाक यांना निवडून देणार असे त्यांनी सांगितले.