कर्नाटकात विधानसभा निवडणुका होत आहेत. देशाच्या दृष्टीने काँग्रेस आणि भाजपच्या अस्तित्वाची लढाई म्हणून या निवडणुकीची चर्चा आहे. मराठी माणूस आणि महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे साहजिकच आहे ते एका मुद्द्यावर, मराठी माणसाचे सीमाभागातील अस्तित्व राखले जाईल की नाही हा तो मुद्दा. सीमाभाग महाराष्ट्रात सामील होण्याची लोकेच्छा आहे. कर्नाटकाच्या स्थापनेपासून आजपर्यंत जितक्या विधानसभा निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये मराठी माणसाच्या महाराष्ट्र एकीकरण समितीने आपले उमेदवार उभे केले आणि निवडून आणले आहेत. सीमावाद सर्वोच्च न्यायालयात जाण्यापूर्वी आणि त्यानंतरही लोकेच्छा दाखवण्याचा मार्ग म्हणूनच या निवडणुकांकडे पाहण्याची पद्धत सीमाभागात आहे, पण सध्या चाललेय तरी काय? ७२ वर्षे लढत राहिलेल्या समितीत बेकीचे आलेले वळण नुकसानीचे ठरेल काय?
१ नोव्हेबर १९५६ साली जरी कर्नाटकाच्या स्थापनेची घोषणा झाली असली तरी त्याची चाहूल १९४६ पासूनच लागली होती. तेंव्हापासूनच हा लढा सुरू आहे. १९५७ च्या निवडणुकापासून संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नावे या निवडणुका लढणे सुरूच आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळाल्यानंतर उर्वरित सीमाभागात निवडणूक हा सुद्धा एक लढ्याचाच भाग समजला जातो. आजही हेच वातावरण जरी सामान्य जनतेच्या मनात असले तरी बेकीच्या माध्यमातून दुसरेच काही शिजूही लागले आहे. याबाबतीत नेमका कोण झारीतला शुक्राचार्य आहे याचा शोध आणि बोध सीमावासीय जनतेनेच घ्यावा लागणार आहे.
सीमाभागात बेळगाव उत्तर, दक्षिण, ग्रामीण, खानापूर आणि निपाणी असे मराठी बहुल मतदारसंघ आहेत. त्या सर्व ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीने आपले उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न केला. पण निपाणीत उमेदवारी स्वीकारण्यास कोण तयार झाले नाही. उर्वरित चार ठिकाणी प्रत्येकी दोन याप्रमाणे समितीचेच आठजण उभे आहेत. राष्ट्रीय पक्षांनी जोर धरलेला असताना भावनेच्या बळावर मतदान करू इच्छिणारी मराठी जनता गोंधळात आहे. दोन दोन उमेदवार उभे करण्याचे राजकारण केले कोणी आणि ही परिस्थिती आली कशामुळे व या परिस्थितीत समितीचा विजय शक्य होईल का याचा विचार त्या बेकी कर्त्यांनी का केला नाही हे प्रश्न सध्या चर्चेत आहेत. १२ तारखेला होणाऱ्या निवडणुकीपूर्वी प्रत्येक मतदारसंघात एकाने माघार घेणे ही काळाची गरज आहे, एवढेच सामान्य मराठी माणसाचे मत आहे.
खानापूर मतदारसंघात तेथील खानापूर तालुका समितीने विद्यमान आमदार अरविंद पाटील यांना डावलून विलास बेळगावकर यांना उमेदवारी दिली आहे. तर भाई एन डी पाटील यांनी मध्यवर्ती समितीच्या माध्यमातून तालुका समितीचे अध्यक्ष दिगंबर पाटील यांनाच निलंबित करून आमदार अरविंद पाटील यांची उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. यामुळे बेळगावकर विरुद्ध पाटील असे युद्ध खानापुरात रंगले आहे. काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर या स्थितीचा फायदा घेऊन पुढे जाण्याच्या प्रयत्नात आहेत. पण त्यांच्यासह इतर राष्ट्रीय पक्ष बाजूला फेकले गेले असून मराठी विरुद्ध मराठी अशीच लढत होईल.
बेळगाव ग्रामीण मतदारसंघात माजी आमदार मनोहर किणेकर यांची उमेदवारी तालुका म ए समितीने जाहीर केली व मध्यवर्तीने त्याला समर्थन दिले, ही निवड एकीची प्रक्रिया पूर्ण करून झाली नाही असा आरोप करून तालुका समितीच्या दुसऱ्या गटाने मोहन बेळगुंदकर यांना उमेदवारी दिली आहे. या दुसऱ्या गटाला किरण ठाकूर यांनी बळ दिले आहे. किणेकर विजयी होणार त्यामुळे ठाकूर यांनी हा दुसरा गट मोडीत काढावा उगाच विजयात अपशकुन करू नये अशी जनभावना आहे, पण किणेकर यांनी निवड समिती फिक्स करून सरस्वती पाटील, तानाजी पाटील, एस एल चौगुले या इतर इच्छूकांची वाट लावल्याने ते सारे सायलेंट झाल्याने काँग्रेस उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांचा फायदा होण्याची शक्यता मोठी आहे.
बेळगाव उत्तर मध्ये बाळासाहेब काकतकर हा ठाकूर गटाचा उमेदवार आहे, तिथे मध्यवर्तीने हस्तक्षेप केलेला नाही पण सध्या दक्षिणचे आमदार असलेल्या संभाजीराव पाटील यांनी उत्तर मध्ये उमेदवारी अर्ज भरून आव्हान उभे केले आहे. उत्तर मध्ये मागील दहा वर्षांपासून काँग्रेस चे आमदार फिरोज सेठ आहेत. त्यांचा पाडाव करण्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन भाजपने अनिल बेनके हा मराठी उमेदवार दिला आहे. ठाकूर आणि संभाजीराव या संघर्षात भाजप चा फायदा होईल की काँग्रेसचा हे अस्पष्ट आहे.पण वातावरण समितीच्या बाजूने असून दोन पैकी एकाने माघार घेतल्यास समिती मतांची बाजी मारून जाणार आहे.
बेळगाव दक्षिण मतदारसंघात भाई एन डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रकाश मरगाळे यांना मध्यवर्ती समितीने उमेदवारी दिली आहे. तर स्वतः शहर म ए समितीचे अध्यक्ष किरण ठाकूर यांनी किरण सायनाक या सध्या नगरसेवक पदावर असलेल्या माजी महापौराला उभे केले आहे. एकीसाठी प्रयत्न करणाऱ्या पाईक व कै सुरेश हुंदरे स्मृतिमंच सारख्या संस्थांना अपयश आले. यात सीमावासीयांच्या अस्तित्वाची लढाई अडकली आहे.
सीमाप्रश्न सुटतोवर पायात व्हाण घालणार नाही अशी शपथ घेऊन जगणाऱ्या सीमतपस्वी मधु कणबर्गी यांनी तर या परिस्थितीत बेकी करणाऱ्या नेत्यांच्या डोक्यात स्वतः मुडण करून घेऊन सणसणीत व्हाणच मारली आहे तरी अक्कला आलेल्या नाहीत. ही स्थिती असताना आता एकीचे नाटक नको आमचे उमेदवार तगडे आहेत असे किरण ठाकूर यांनी जाहीर केले आहे, यामुळे निवडणूक होईतोवर एकि होण्याची शक्यता मावळली आहे.