भाजप हा शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखला जातो. संघाच्या शिस्तीने चालणाऱ्या या पक्षात शिस्त महत्वाची मानली जाते, पक्षाच्या घटनेला पाळत वाटचाल करणारे नेते या पक्षात आहेत, तसेच आततायीपणा करणारी मंडळीही आहेत, सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या पक्षातील शिस्तभंगाची चर्चा जोरदार आहे, शिस्तभंग करणाऱ्यांवर वरिष्ठ नेत्यांनी कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
पक्षाने राज्यातील सर्व मतदारसंघात आपले उमेदवार देण्यावर भर दिला आहे. यासाठीच्या दोन याद्या यापूर्वीच प्रसिद्ध झाल्या तर तिसरी यादी अजून बाहेर आलेली नाही, ही तिसरी यादी बाहेर येण्यापूर्वीच काही इच्छूकांनी स्वतःच आपली उमेदवारी जाहीर करून घेतली आहे. यामुळे पक्षाची शिस्त भंगल्याची जोरदार चर्चा आहे.
कोणत्याही उमेदवाराच्या निवडीची घोषणा पक्षाच्या निवड समितीने जाहीर केल्याशिवाय ती निवड अधिकृत मानली जात नाही, इतर पक्षही हा नियम पाळत आले आहेत, भाजप तर असे नियम पाळण्याच्या बाबतीत आदर्श पक्ष मानला जातो पण काही लोकांनी या नियमाला आणि आदर्शालाच सुरुंग लावल्याचे पडसाद बेळगावात उमटले आहेत.
अशा उमेदवारांवर कारवाई करा अशी मागणी वाढली आहे, आता पक्ष किंवा पक्षाचे राज्य पातळीवरील वरिष्ठ कोणती कारवाई करतात हे पुढील काळात स्पष्ट होईल, कारवाई न झाल्यास स्थानिक कार्यकर्त्यांचा रोष पक्षाला स्वीकारावा लागणार आहे.