विध्यमान आमदार अरविंद पाटील यांनी थेट भाई एन डी पाटील यांच्याकडून आपली उमेदवारी जाहीर करून घेतली आहे. खानापूर तालुका समितीने दुसरा उमेदवार म्हणून विलास बेळगावकर यांचे नाव घोषित केले आहे, यामुळे खानापूर मध्ये मराठी विरुद्ध मराठी असा संघर्ष सुरू राहिला आहे.
अरविंद पाटील हे आमदार झाले, सलग दुसऱ्यांदा आपणासच उमेदवारी मिळावी हा त्यांचा आग्रह आहे. तर समितीचे अध्यक्ष दिगंबर पाटील आणि इतरांनी यावेळी दुसऱ्याला संधी देऊ अशी भूमिका घेऊन बेळगावकर यांचे नाव घोषित केले आहे. हे असे करणे चुकीचे आहे असा निर्णय देऊन मध्यवर्ती समितीने दिगंबर पाटलांनाच अध्यक्ष पदावरून निलंबित केले, हा निर्णय आपल्याला मान्य नाही, मध्यवर्तीच बरखास्त करा अशी दिगंबर पाटील यांनी मागणी केली. हा संघर्ष सुरू असतानाच भाई एन डी पाटील यांनी सरळ सरळ अरविंद पाटील यांचे नाव घोषित केल्याने आता संघर्षात आणखी वाढ झाली आहे.
निलंबन आणि थेट घोषणा करून हा संघर्ष वाढवण्यापेक्षा समन्वय साधून एक उमेदवार द्यायला हवा होता, पण तसे झाले नाही.
अरविंद पाटील यांनी निवडून आल्यानंतर मराठी जनतेकडे पाहिले नाही असा आरोप झाला. मागील दीड दोन वर्षांपासून हा संघर्ष सुरू आहे. वाद सुरू असताना ते वेळेत संपतील याकडे लक्ष दिले गेले नाही आता त्याचा चुकीचा परिणाम दिसत आहे.
खानापुरात सुरू झालेला मराठी विरुद्ध मराठी संघर्ष बेळगाव शहर आणि तालुक्या पर्यंत येऊ नये आणि खानापुरात मराठीचा झेंडा फडकावा हीच अपेक्षा..