कर्नाटकात जेडीएस राष्ट्रवादीच्या मदतीने तिसऱ्या आघाडीच्या गणिताची बोलणी सुरू असतानाच आता राष्ट्रवादीशी मैत्रीचे दोर कापणार असे जेडीएस नेते आणि माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
दावणगेरे येथे ते एका कार्यक्रमात बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा मेळावा घेऊन सर्वाधिक उमेदवार निवडून द्या असे आवाहन केले.
समितीची भूमिका कर्नाटक विरोधात आहे. अश्या संघटनेला जर पवार मदत करत असतील तर जेडीएस त्यांना घेऊन सरकार स्थापणार काय? असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला, तेंव्हा कुमारस्वामी यांनी आता ही मैत्री ठेवणे कठीण आहे असे सांगितले.
कर्नाटकात सत्ता स्थापन करण्यासाठी आम्ही राष्ट्रवादीशी हात मिळवणी सुरू केली होती. त्याबद्दल काही बैठकाही झाल्या पण आता अंतिम निर्णय अशक्य आहे. पवारांनी मराठी लोकांना मदतीची भाषा केली आहे यामुळे आता ही मैत्री अशक्य असेही ते म्हणाले.