या अगोदर केंद्रीय मंत्री क्वचितच बेळगाव शहराला भेट द्यायचे मात्र गेले सहा महिन्यापासून केंद्रीय मंत्र्यांच्या बेळगाव वाऱ्या वाढल्या आहेत. आगामी विधान सभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अनेक दिग्गज नेत्यांना बेळगाव दौऱ्यावर पाठवणे सुरु केले आहे.
गेल्या नोव्हेंबर महिन्यात केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धन सिंह राठोड यांच्या दौऱ्याने भाजपचे केंद्रीय मंत्री बेळगावला यायला सुरु झाले होते. त्यानंतर रेल्वे मंत्री पियुष गोयल, गृह मंत्री राजनाथ सिंह,नागरी विमान उड्डाण मंत्री गजपती राजू,महिला बाल विकास मंत्री मनेका गांधी सारखे अनेक मंत्री येऊन गेलेत आगामी मार्च महिन्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी,गुजरात च्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल आणि प्रवक्ते संबित पात्रा यांचे संभाव्य दौरे आहेत. या शिवाय मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा देखील व्हायची शक्यता आहे. केंद्रीय रासायनिक खत मंत्री अनंतकुमार हे महिन्या दोन महिन्यातून एकदा बेळगावात येतच असतात तर कौशल्य विकास राज्य मंत्री अनंत कुमार हेगडे यांना तर उत्तर बेळगावचा प्रभारीच नियुक्त करण्यात आलं आहे.
जस जशी निवडणूक जवळ येऊ लागली आहे तस तसे मंत्र्यांचे दौरे वाढू लागले आहेत स्थानिक भाजप नेतृत्वावर तेवढा विश्वास नसल्याने असे मंत्र्याच्या बेळगाव वाऱ्या वाढलेत का असा संशय देखील व्यक्त केला जात आहे.गेल्या पाच वर्षात कर्नाटकात म्हणावा तेवढा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून भाजपला आपली छबी तयार करण्यात अपयश आले आहे की काय त्यामुळेच केंद्रीय नेते येऊन भाजपचा ढोल पीठत आहेत असं देखील जाणकारांच मत आहे.
काँग्रेस चा गड फक्त आणि फक्त कर्नाटकवर शिल्लक आहे. हा गड राखण्यासाठी काँग्रेस जंग जंग पछाडत आहे, त्यात प्रत्येक मतदार संघात कुणाला उमेदवारी यावरून भाजप मध्ये वाद आहेत, अशा स्थितीत कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस चा पाडाव करण्यासाठी भाजपने हे समीकरण सुरू केल्याची चर्चा आहे.