जारकीहोळी बंधुत गंभिर मतभेद झाले असून याचा परिणाम म्हणून यमकनमर्डी मतदार संघात लखन आणि सतीश जारकीहोळी हे दोघे बंधू एकमेकाविरोधात आमने सामने उभे राहण्याची शक्यता आहे. या कुटुंबाच्या जवळच्या लोकांनीच ही माहिती बाहेर काढली असून यावर विश्वास ठेवल्यास एक मतदारसंघात दोन भावांची राजकीय लढाई बघायला मिळण्याची शक्यता आहे.
काँग्रेस पक्षाने या बंधुतील मतभेद मिटवण्याचे बंगळूर येथे केलेले प्रयत्न अपुरे ठरले आहेत, यामुळे काय करायचे या विवंचनेत लखन आणि रमेश अडकले आहेत. लखन यांना काँग्रेस पक्षातर्फे तिकीट घेऊन यमकनमर्डी मतदारसंघात निवडणूक लढवायची आहे पण सतीश काही करून आपला मतदारसंघ सोडण्यास तयार नाहीत म्हणूनच आता भाजपात जाऊन त्याच मतदारसंघात भावा विरोधात शड्डू ठोकण्याचा लखन यांचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती त्यांच्याच काही निकटवर्गीयांनी उघड केली आहे.
२५ मार्च रोजी होणाऱ्या भव्य कार्यक्रमात ते भाजप मध्ये प्रवेश करतील असेही सांगण्यात येत आहे. रमेश यांनीही लखन यांना काँग्रेसने यमकनमर्डी मतदारसंघातच उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केला पण यश आले नाही. सतीश यांना रायचूर मतदारसंघात पाठवा अशी मागणी पक्षाने फेटाळली आणि सतीश यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष केले यामुळे हे दोन्ही बंधू जास्तच नाराज झाले असल्याचेही वृत्त बाहेर पडले आहे.
सतीश विरुद्ध लखन अशी लढाई झाल्यास समितीने देखील आपला उमेदवार का देऊ नये याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.