योग्य उमेदवार दिला तर आजही बेळगाव उत्तर मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय निश्चित आहे. आपल्याला एक सामान्य नागरिक म्हणून लोक ओळखतात, आपल्यातलाच उमेदवार मिळाला तर इतरत्र विखुरले गेलेले समितीचे नागरिक तसेच मराठी भाषिक एकत्र आणण्यात यश येऊ शकते असे मत माजी नगरसेवक वकील अमर येळ्ळूरकर यांनी काढले आहेत.उत्तर मतदार संघातील समितीच्या संभाव्य उमेदवारांच्या मुलाखातीच सत्र बेळगाव live ने पुढे सुरू केलेल आहे.महाराष्ट्र एकीकरण समितीचा जो लढा सुरू आहे, त्यात आपली एकच मागणी आहे की मराठी भाषिक मुलुखामध्ये आपला समावेश व्हावा. गेली ६० वर्षे आपण एक ध्येयाने एक मनाने महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी कार्य करत आहोत.आता राष्ट्रीय पक्षांचा प्रभाव इतका मोठा झाला आहे की ते समिती संपली असे सांगून दिशाभूल करू लागले आहेत. मात्र आपल्या मराठी मायबोलीचा जर विचार केला तर आजच्या घडीला ही मायबोली टिकवणं सर्वात जास्त महत्वाचं आहे अस देखील ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की सीमाभागामध्ये आपलं अस्तित्व टिकवणं जास्त महत्वाचं आहे.
सगळ्यांनी वाद आणि मतभेद विसरून काळाची गरज ओळखून एक उमेदवाराच्या पाठीशी उभे राहून विजय मिळवावा लागणार आहे.उत्तर मतदार संघाचा विचार केला तर समितीचा उमेदवार या मतदारसंघात निवडून आणलाच पाहिजे. कोण उमेदवार आहे हे महत्वाचे नसून महाराष्ट्र एकीकरण समिती निवडून येणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने जर सर्व गट तट एकत्र येऊन उमेदवार दिला तर माझी निवडणूक लढवायची तयारी आहे. जर माझ्यापेक्षाही कोण चांगला उमेदवार असेल आणि त्याला जर सर्वानुमते उमेदवारी मिळत असेल तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्याला निवडून आणण्यासाठी तन मन धन खर्च करण्यासही आपण कटिबद्ध राहणार आहे .
आज जे युवकांचे विचार आहेत, आपल्या प्रश्नासाठी लढायची जी युवकांची तळमळ आहे, ही तळमळ पाहिली की सर्व मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीचेच उमेदवार निवडून येतील याची खात्री वाटते. राष्ट्रीय पक्ष कितीही सांगत असले तरी मराठीपण टिकवायचे असेल तर समितीशिवाय पर्याय नाही असा दावा देखील त्यांनी केला आहे.
मराठीसाठी लढणाऱ्या या संघटनेला आम्ही पाठींबा देऊया आणि उत्तर मतदारसंघात समितीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वजण प्रयत्न करूया.विचाराने चाललेल्या या लढ्यात लोकशाही मार्गाने निवडणूक जिंकणे हा एक भाग आहे. उमेदवार कोण आहे कोण नाही आणि आपण निवडणूक का लढू नव्हे असे वेगवेगळे विश्लेषण कोणी करत असतील तरी आपण उमेदवार देणं हेच गरजेचं आहे.
आपण एक सामान्य माणूस आहे, सर्वांच्या मदतीला धावून जाण्याची आपली भावना आहे यामुळे सर्वसामान्य वर्गातील इतर भाषिक मतेही घेण्याची आपली क्षमता आहे असेही ते म्हणाले.