कणबर्गी येथे शेतजमीन हिसकावून घेऊन वसाहत योजना राबविण्याच्या विचारात असलेल्या बुडाचा विरोध करत कणबर्गी च्या शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले आहे.
काहीही झाले तरी बुडाला ही वसाहत होऊ देणार नाही कुणीही आले तरी मागे हटणार नाही असे आव्हानच शेतकऱ्यांनी दिले.
माजी महापौर शिवाजी सुंठकर, सिद्धेश्वर शेतकरी संघ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले, गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. बुडाने कारस्थान करून शेतकऱ्यांची जमीन हिसकावून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे , असा आरोप करून घोषणा देण्यात आल्या.
भाजप नेते अनिल बेनके यांनी हा प्रश्न न्यायालयात सुरू असताना बुडा जी भूमिका घेत आहे ती निषेधार्ह आहे असे सांगून काँग्रेस च्या आमदारांनी बुडाचे चेअरमन पद घेऊन जे काही सुरू केले आहे यात शेतकऱ्यांची गळाघोट घेण्याचा डाव असून आम्ही त्याला प्रखर विरोध करतो, आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत असे सांगितले.
बेळगाव शेतकरी संघटनेनेही या आंदोलनात सहभागी घेऊन आपला पाठींबा दिल्याने बुडा हादरून गेले आहे.