निवडणूक जवळ आली की राजकीय व्यक्ती व्होटबँक साठी सणवार ही सोडत नाहीत. असाच प्रकार मंगळवारी शहापूर वडगाव भागात पाहायला मिळेल. दोन इच्छूक उमेदवारांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी होळींचे कार्यक्रम ठेऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रकार सुरू केला आहे.
वडगाव आणि शहापूर भागात दरवर्षी पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी करतात. यापूर्वी कधीच कुठल्याच व्यक्तीने या भागासाठी रंगपंचमीचा सामुदायिक उपक्रम किंवा कार्यक्रम ठेवला नव्हता, पण निवडणूक आली आणि रंगाच्या नावाखाली आपल्या मागे किती लोक आहेत हे पक्षांना दाखवण्याचे काम सुरू झाले यामुळे नागरिकांना एक नव्हे तर दोन दोन ठिकाणी रंग उधळण्याचा आनंद लुटता येणार आहे.
यापैकी दोघांचाही डोळा ठराविक वर्गाच्या मतदारांवर असून विणकर लोक कुणाच्या कार्यक्रमात जास्त यावरून निवडणुकीत काय होणार हे भवितव्य सिद्ध होणार आहे. आजकाल सगळेच लोक गाणी लागली की नाचू लागल्याने कोण कुणाच्या तालावर नाचणार हे दिसून येईल.
यापैकी एकाने आपल्या विरोधी पक्षातल्या उमेदवाराला कार्यक्रम ठेवण्यास परवानगी मिळू नये म्हणून कुरघोडी केली. काँग्रेस पक्षाच्याच लोकप्रतिनिधींचा वापर यासाठी झाला. पण उमेदवारही पक्षात वजन बाळगून असल्याने त्या आमदारांचे काही चालले नाही. आता कोण किती जास्त रंग उडवले त्यावर कुणाचे पारडे जड हे ठरेल असे त्यांना वाटत असून उद्या राजकीय रंग जोरदार उडणार आहेत.
Trending Now