बिजली गीराने मै हु आई…किसीं के हात ना आयेगी ये लडकी असे म्हणत वयाच्या ५४ व्या वर्षीही घायाळ करणारी अभिनेत्री श्रीदेवी हीचे दुबईत विवाह सोहळ्याला गेली असता निधन झाले. यामुळे सारा देश हळहळला. बेळगावातही अशीच हळहळ तिच्या चाहत्यांना आहे. याचवेळी ही हळहळ आणखी वाढवून टाकणारी बातमी बेळगाव live च्या हातात आली आहे.
जर दुबईत श्रीदेवीचे निधन झाले नसते तर बेळगावच्या चाहत्यांना श्रीदेवीला जवळून पाहता आले असते, कारण ती बेळगावला येणार होती. आणि तिचे निधन झाले नसते तर ती आलीही असती, पण या बाबतीत तिचे चाहते दुर्दैवी ठरले असेच म्हणावे लागेल.
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बेळगावला एक राज्य पातळीवरील फॅशन शो होणार होता. या फॅशन शो च्या बक्षीस वितरण समारंभास श्रीदेवी ला आमंत्रित करण्यात आले होते. बेळगावच्याच एक संस्थेने तिची भेट घेऊन तिला या कार्यक्रमासाठी निश्चित केले होते. पण देवाच्या मनात वेगळेच होते. त्यामुळे श्रीदेवीचे निधन झाले आणि तिला जवळून पाहण्याची संधीही गेली आहे.
त्या संस्थेने मुंबईत जाऊन श्रीदेवीची भेट घेतली होती. तारीख ठरवून मानधनही ठरवण्यात आले होते. यासाठी फिल्मी क्षेत्रात वजन असणाऱ्या एक माणसाने आपले वजनही वापरले होते. ही सगळीच मंडळी नाराज झाली आहेत.
आता कार्यक्रम पुढे ढकलण्यात यावा का यावर चर्चा सुरू आहे. या संस्थेने आपले नाव उघड करण्यास मनाई केली आहे. श्रीदेवी येणार होती पण ती आली नाही आता आमचे नाव जाहीर करून काय उपयोग असे आयोजक निराश होऊन बोलत होते. तरीही आता माधुरी दीक्षित किंवा सोनाक्षी सिन्हा हिला बोलावून हा फॅशन शो केला जाणार आहे. पण कार्यक्रमात श्रीदेवीचे चित्र लावून तिला श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.