बेळगाव शहर, खानापूर तालुका, बेळगाव तालुका येथील घटक समित्यामध्ये तात्काळ एकी होण्याची गरज आहे. निवडणूक जवळ येत असताना ही एकीची प्रक्रिया घडवून आणण्यासाठी समिती नेत्यांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे, अन्यथा मागील दोनवेळा बेकीचा दुष्परिणाम काय असतो याची जाण असूनही पुन्हा पायावर कुर्हाड मारून घेण्याचाच प्रकार होऊ शकतो याचे भान बाळगण्याची गरज आहे.
समितीच्या लढ्यात युवावर्ग जागृत झाला ही समाधानाची बाब आहे. समितीतल्या सर्वच नेत्यांना युवकांनी म्हणजेच समितीच्या पाईकांनी एकीची निवेदने दिली आहेत, ही निवेदने देण्यात आल्या नंतर काही नेत्यांकडून चुकीची वागणूक मिळाली, काहींनी मौन पाळले,काहींनी सावध भूमिका तर काहींनी आपण तुमच्या बरोबर आहे असा विश्वासही दिला आहे, यामुळे तरुणांच्या भावनेला थोडी निराश लाभली असली तरी सर्व नेते एकाच व्यासपीठावर येतील अशी आशाही निर्माण झाली आहे. पूर्वी तरुण या नेत्यांचे त्या नेत्यांचे असे कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते पण आता ते समितीचे पाईक या एकाच नावाने ओळखू लागले आहेत, यामुळे नेत्यांवर दबाव आणण्यात ते यशस्वी होत आहेत.
हे यश पूर्णपणे मिळण्यासाठी आत्ता नेत्यांची भूमिका महत्त्वाची असेल.
ज्यांनी ज्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला त्या नेत्यांना घेऊन नकारात्मक विचार करणाऱ्यांना ताळ्यावर आणणे गरजेचे आहे. समिती मोठी मी मोठा नाही. पद महत्वाचे नाही आणि मला कुठल्याच खुर्चीचा मोह नाही असे भाषणात सांगणे सोपे असते पण प्रत्यक्षात ते सिद्ध करून दाखवणे अवघड असते, यासाठी आता युवकांना जास्त मेहनत घ्यावी लागणार की सारे मोह आणि आशा दूर ठेऊन नेते नेते एक विचाराचा अवलंब करणार हे लवकरच स्पष्ट होऊ शकेल.
समितीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करण्याची युवकांची तयारी आहे. राष्ट्रीय पक्षांचा, पैशाचा, दारू मटणाच्या पार्टीचा मोह बाजूला सारून युवक मराठी अस्मिता बाळगण्याची तयारी दाखवतात याला काही नेत्यांच्या भूमिकेने खीळ बसणार असेल तर विचार करावा लागेल. साऱ्या नेत्यांचे सीमाप्रश्नी आपापल्या परीने योगदान आहे हे मान्य मात्र ते योगदान वैयक्तिक स्वार्थ करत बसून वाया जात असल्यास जुने नेते बाजूला सारून नवीन नेतृत्व निर्माण करण्याची ताकत युवा वर्गात निर्माण झाली, यामुळेच समितीच्या लढ्यात तरुण नाहीत असे म्हणणाऱ्या विरोधकांची तोंडे बंद होतील तसेच अंतर्गत मतभेद वाढवून फायदा घेणाऱ्यांचेही मनसुबे धुळीला मिळतील यात शंका नाही.