बेळगाव चा स्केटिंगपटू रोहन कोकणे याने तिसऱ्यांदा लिम्का जागतिक विक्रमावर आपले नाव कोरले आहे.
२८ मे रोजी केएलई च्या स्केटिंग रिंक वर त्याने आपल्या हनुवटीवर ३० फुटाचा पाईप ठेऊन तोल सांभाळत स्केटिंग केले होते. ४.३ किलो वजनाचा तो पाईप २.१९ मिनिटे घेऊन तो फिरला होता.
हा विक्रम वेगळा आहे, आजवर अश्या प्रकारचा प्रयत्न कुणी केला नव्हता, असे रोहनने बेळगाव live शी बोलताना सांगितले. आपले पालक, जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर आणि समस्त बेळगाव च्या जनतेच्या प्रोत्साहनाने आपल्याला ही शक्ती दिली असे त्याने सांगितले आहे.
रोहन हा आर एल एस कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिकत आहे. तो केएलई संस्था तसेच रोटरी कॉर्पोरेशन स्केटिंग रिंकवर सराव करतो, यापूर्वीही दोनवेळा त्याने लिम्का बूक मध्ये विक्रम नोंदवले आहेत.
महापौर संज्योत बांदेकर यांच्या हस्ते शनिवारी त्याचा या विक्रमाबद्दल सत्कार झाला. यावेळी माजी महापौर सरिता पाटील, किरण सायनाक,महेश नाईक, गटनेते पंढरी परब, प्रशिक्षक उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर व सूर्यकांत हिंडलगेकर आदी उपस्थित होते