कर्नाटकात विधानसभा निवडणूक होणार आहे, या निवडणुकीत भाग घेण्यास गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांवर अंकुश येण्याची शक्यता आहे, निवडणूक आयोग प्रत्येक उमेदवाराच्या अर्जाची पडताळणी करताना त्याच्यावर असलेल्या गुन्ह्यांची यादीही तपासणार असून गुन्हेगारी पार्श्वभुमीच्या उमेदवारांना निवडणुकीतून बाद ठरवले जाण्याची मोठी शक्यता आहे.
याबद्दल सध्या राजकीय क्षेत्रात जोरात चर्चा आहे, निवडणूक आयोगाने प्रत्येक जिल्ह्यातील निवडणूक अधिकाऱ्यांना याबद्दलची सूचना देण्याची तयारी केली आहे, विशेष म्हणजे सध्या निवडणुकीसाठी इच्छुक म्हणून मिरवत असलेल्या व्यक्तींचीही पूर्वीच पडताळणी करून ठेऊन अर्ज भरल्यानंतर जोवर सर्व गुन्ह्यात निरपराध ठरत नाही तोवर निवडणूक नाही अशी सूचना केली जाणार आहे. सध्यातरी नुसती चर्चा असूनही राजकीय स्वप्ने पाहणारे अस्वस्थ आहेत.
आचार संहिता जाहीर झाल्यावर पैसे व भेटवस्तू वाटता येत नाहीत म्हणून काही उमेदवार आत्ताच साडी, कुक्कर, इस्त्री, सहली अशी वाटप करत आहेत, अशांवरही निवडणूक आयोगाने लक्ष ठेवल्याची माहिती मिळत आहे. उपलब्ध मालमत्ता किती आणि वाटप किती याचा ताळमेळ घालून इतका पैसे कुठून आला याचीही पाहणी सुरू आहे, यामुळे वाटप करणारे सुद्धा अडचणीत येणार आहेत.
कोण उमेदवार असे वाटप करीत असल्यास त्याबद्दल निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून देणे हे कर्तव्य जागरूक नागरिकांनी पार पडल्यास भ्रष्ट नसलेले उमेदवार निवडणुकीत निवडून येऊ शकतील, नाहीतर मते विकत घेऊन पुढे जनतेचीच लूट करून पैसे कमावणारे निवडून येणार आहेत, याचे भान जनता ठेऊन राहिली तरच निवडणूक आयोगाचे काम सोपे होऊ शकणार आहे.
कोणत्याही परिस्थितीत अंकुश येणार या चर्चेने भल्या भल्यांची झोप उडवली आहे, प्रत्यक्षात कारवाई सुरू झाल्यास अश्या उमेदवारांचा पेरलेला पैसा वाया जाणार आहे.