Saturday, April 27, 2024

/

जांबोटीत गुंफण साहित्य संमेलनाची जोरदार तयारी संमेलन अविस्मरणीय ठरण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा

 belgaum

सौंदर्याचे वरदान व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जांबोटीकरांना १५ व्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाचे वेध
लागले आहेत. जांबोटीकरांनी या साहित्य संमेलनाची जोरदार तयारी केली असून हे संमेलन अविस्मरणीय ठरावे यादृष्टीने सर्वजण जिवाचे रान करत आहेत.
सातारा जिल्ह्यातील गुंफण अकादमी व जांबोटी येथील दि जांबोटी मल्टीपर्पज को – ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन
करण्यात आले आहे. सीमाभागातील जांबोटीसारख्या निसर्गरम्य परिसरात हे साहित्य संमेलन होत असल्याबाबत महाराष्ट्रात कमालीचे औत्सुक्याचे वातावरण असून सीमाभागातही मराठी भाषिकांमध्ये संमेलनाविषयी आत्मीयतेची भावना आहे.

gunfan sahitya
त्यामुळे सर्वांनाच संमेलनाचे वेध लागले असून संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वच घटक प्रयत्नशील आहेत, असे अकादमीचे सीमाभागातील समन्वयक गुणवंत पाटील तसेच दि जांबोटी मल्टीपर्पज को – ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष विलास बेळगावकर यांनी सांगितले.
संमेलनाच्या नियोजनात कसलीही कसर राहू नये यासाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या असून त्यांच्यावर जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. या
समित्यांच्या बैठका होत असून त्यातून युध्दपातळीवर तयारी सुरू आहे. संमेलनासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून तसेच सीमाभागातून साहित्यिक व साहित्य रसिक येणार आहेत. त्यांच्यासाठी अल्पोपहार, भोजन आदी व्यवस्था केली आहे. बेळगावपासून जांबोटीपर्यंत व परिसरात ठिकठिकाणी संमेलनाचे
फ्लेक्स उभारण्यात आले असून त्याद्वारे सर्वत्र संमेलनाची
वातावरणनिर्मिती झाली आहे. काही ठिकाणी स्वागत कमानी लावण्यात येत आहेत.
बाबुराव ठाकूर पदवीपूर्व महाविद्यालयाच्या आवारात संमेलन होत असून संमेलनस्थळाला जांबोटीचे सुपुत्र व आद्य व्याकरणकार ‘स्व. रामचंद्र
भिकाजी गुंजीकर साहित्यनगरी’ असे नाव देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. तर व्यासपीठाला ‘स्व. सौ. वनिता गुणवंत पाटील व्यासपीठ’ असे नामकरण करून त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
चौकट
ग्रंथदिंडीत साहित्यकृतींचा सन्मान !
मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीच्या जतन व संवर्धनासाठी गुंफण अकादमीच्या माध्यमातून सर्वत्र ग्रंथालय व वाचन – लेखन चळवळ राबवली जात असून सीमाभागातही मराठीला बळ देण्याचे कार्य सुरू आहे. या कार्यात सक्रीय सहभाग नोंदवण्यासाठी एक आगळा उपक्रम गुणवंत पाटील यांच्या संकल्पनेतून राबवला जात आहे. संमेलनानिमित्त निघणाऱ्या ग्रंथदिंडीत पालखीमध्ये ज्ञानेश्वरी, गाथा आदी ग्रंथ ठेवण्याचा प्रघात चालत आला आहे. त्याबरोबरच
साहित्यिकांनी आपली प्रकाशित पुस्तके पालखीत ठेवावीत. ग्रंथदिंडीद्वारे
आपल्या साहित्यकृतींचा आगळा सन्मान यातून होईल व ही पुस्तके या
कार्यासाठी दान करायची आहेत. ही ग्रंथसंपदा जांबोटीत निघणाऱ्या गुंफण ग्रंथालयाला संमेलनात भेट देण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.