आरक्षण बदलले, आपल्याकडे त्या आरक्षणाचा माणूस नाही, अशावेळी कन्नड नगरसेवका कडून मोठी माया उचलून त्याला मराठी सत्तेचा महापौर ठरवण्याचा घाट आहे. यासाठी काहीजण प्रयत्न करत असून मराठी गटात आल्याचे दाखव आणि भरपूर पैसेही दे तुला महापौर करतो अशी गळ एक नगरसेवकाला घालण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. सीमाप्रश्नाचा ठराव करण्याकडे मात्र सोईस्कर दुर्लक्ष करण्यात येत आहे.
बेळगाव महानगरपालिकेची महापौर उपमहापौर निवडणूक मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. यावेळी महापौर पद मागासवर्गीय गटासाठी तर उपमहापौर मागास अ महिलेकरिता राखीव आहे. मराठी गटात या जाती प्रवर्गाचे उमेदवार नाहीत, यामुळे उमेदवार नाही म्हणून सत्ता कन्नड गटाकडे सोडण्याची वेळ आली आहे. उलट कन्नड गटात या वर्गाचे दोन नगरसेवक असल्याने त्यांच्यातही फुटच पडली आहे.
या फुटीचा फायदा घेऊन त्यापैकी एकाला सत्तेचे आमिष मराठी गटाने दाखवले असून गटाचे काही मोजके प्रमुख आपले खिसे भरून घेण्याच्या मार्गावर आहेत.
हा पेच निर्माण झाला तेंव्हाच मराठी जनतेने मनपात सीमाप्रश्नाचा ठराव मांडा अशी मागणी केली होती, १ मार्च पर्यंत महापौर संज्योत बांदेकर यांचा काळ आहे, त्यांनी लागलीच हा ठराव मांडून टाकावा, मनपा बरखास्त होऊन जाऊदे, असा सूर जनतेचा आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून सत्तेत नसलो तरी पैसे मिळाले पाहिजेत या सूत्राने मराठी नगरसेवक वागत आहेत. मराठी जनतेने आणि त्यांना निवडून देण्यासाठी आशीर्वाद देणाऱ्या नेत्यांनी वेळीच सावध व्हावे लागणार आहे.