एपीएमसी पोलिसांनी नकली सोने विकून फसवणाऱ्या तीन जणांच्या टोळक्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वन्नूर ता बैलहोंगल येथील विशाल बायप्पा पाटील वय ३५, दिलावरसाब महंमद साब मुर्गी वय ५५, आणि मुरकीभावी येथील शिवाप्पा बाळाप्पा उप्पार वय ५६ अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडील नकली सोन्याचे तुकडे, दोन मोटरसायकल, सव्वा लाख रुपये असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
आपले कुटुंब अडचणीत आहे, आम्हाला पैशाची गरज आहे, देणगीतून मिळालेले सोने आहे, कितीही पैसे द्या आणि सोने घ्या असे सांगून ओळखीच्या तसेच अनोळखी व्यक्तींना ते फसवत होते.
शिवानंद हिडदुग्गी व शिवगौडा पाटील या एपीएमसी हद्दीतील दोघांना त्यांनी फशी पाडले होते, त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई झाली आहे. त्यांच्याकडून पाच मोबाईल आणि सिमकार्डही जप्त करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक जे एम कालिमिर्ची अधिक तपास करीत आहेत.आरोपींची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली.