आपले बेळगाव, शांत आणि सूंदर बेळगाव गेल्या काही वर्षांत ड्रग ट्रॅफिकिंग चे एक केंद्रच बनत चालले आहे, नेपाळ आणि इतर भागातून तसेच समुद्र मार्गे गोव्याकडून येणारे अंमली पदार्थ बेळगावात विकले जातात आणि या मागे मोठे तस्कर आहेत, स्मार्ट सिटी कडे वाटचाल करणाऱ्या बेळगाव ची ही स्थिती शोभनिय नाही, या ड्रग तस्करांना कोण चालना देतोय हे आत्ता पोलिसांना शोधावे लागेल.
बेळगावचे तरुण गांजाच्या नशेबरोबर ब्राऊन शुगरही घेऊ लागले हे धक्कादायक आणि तितकेच धोकादायक आहे. तरुण पिढी दारू, गुटखा, बिडी सिगारेट या व्यसनात शिरून पुढे महाभयानक अशा अंमली पदार्थांच्या जाळ्यात अडकून पडू लागली आहे, हे तरुण व्यवसाय उद्योगाची चांगली स्वप्ने पहायचे सोडून नशेचे व्यापारी बनत आहेत, याची कुणकुण पोलिसांना लागली आणि त्यांनी कारवाई केली ही समाधानाची गोष्ट असली तरी असे आणखी किती तरुण या चक्रात अडकलेत आणि त्यांचे म्होरके कोण कोण आहेत, याचा शोध लागल्या शिवाय बेळगाव वरचे हे संकट दूर होणे कठीण आहे.
विदेशी पर्यटक गोव्याला जास्त आकर्षित होतात, बेळगाव हे त्यांच्यासाठी प्रवासास योग्य मार्गावरील एक शहर आहे, हे शहर अन्न, हॉटेल आणि जोडीला अंमली पदार्थ मिळणारे केंद्र म्हणूनही ओळखले जात असल्याने आता विदेशी लोकांना बेळगाव मार्गे जाऊन ड्रग पुरवणारे एजंट वाढू लागले आहेत.
मागे पोलीसप्रमुख असताना हेमंत निंबाळकर यांनी ड्रग विक्री करणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश केला होता, त्यानंतर हे प्रमाण कमी म्हणण्यापेक्षा छुप्या मार्गाने सुरूच राहिले पण त्यावर कारवाई झाली नव्हती, मात्र आता कारवाई झाली असल्याने काही प्रमाणात ड्रग तस्करीला आळा बसेल की हप्ता वाढवून घेण्याचे माध्यम म्हणून ही कारवाई ओळखली जाईल याचा शोध घ्यावा लागेल.
अंमली पदार्थांच्या नादाला लागलेली व्यक्ती नशेसाठी कोणताही मार्ग स्वीकारू शकते, यामुळे चोऱ्या, लूटमार आणि दरोडे घातले जातात, याचा विचार करून स्वतःवर नियंत्रण ठेऊन युवाशक्तीने वागावे, नाहीतर पुढचे भविष्य अधांतरी असेल,