बेळगावसह सीमाभाग कर्नाटकात घातला जावा म्हणून लढलेल्या आणि त्यासाठीच कर्नाटक सिंह पदवीसाठी पात्र ठरवले गेलेल्या कर्नाटक सिंहाच्या पुतळ्याचीही कर्नाटक सरकार आणि प्रशासनाने दुर्दशा करून ठेवली आहे.
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी गंगाधरराव देशपांडे यांच्या कलामंदिर टिळकवाडी येथील पुतळ्याची ही अवस्था दुर्दैवी आहे. हा पुतळा पूर्णपणे दुर्लक्षित राहिला असून आज माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, खादरवाडीचे माजी चेअरमन रामलिंग पाटील, किरण पवार आदींनी खेद व्यक्त केला आहे. गंगाधरराव स्वातंत्र्य सैनिक होते शिवाय हा सीमाभाग महाराष्ट्रात राहू देण्याला त्यांनी कडाडून विरोध केला याची तरी जाण कर्नाटक सरकारने ठेवायला हवी होती, हे या घटनेवरून दिसून येते, आपण महाराष्ट्राची बाजू घेतली असती तर बरे झाले असते असे या कर्नाटक सिंहाचा आत्मा खेदाने म्हणत असावा अशीच दुर्दैवी स्थिती आहे.
या पुतळ्याच्या शेजारी उध्यान करावे, नागरिकांना बसण्याची सोय करावी अशी मागणी आता मनपा अधिकारी व नगरसेवकांकडे करणार आहे असे या मंडळींनी सांगितले आहे. माजी प्राचार्य आनंद मेनसे, किशोर काकडे व अशोक याळगी यांना या पुतळ्याची दुर्दशा पाहून फार यातना झाल्या आणि त्यांनी ही बाब निदर्शनाला आणून दिली यामुळेच आपण भेट दिली, पुतळ्याची अवस्था गँभिर आहे, असा खेद त्यांनी व्यक्त केला.
सीमाप्रश्नी प्राणपणाने लढलेले बाबुराव ठाकूर हे गंगाधरराव देशपांडे यांना ते कर्नाटक सिंह होण्यापूर्वी गुरू मानत. दोघेही महात्मा गांधींचे शिष्य. मात्र सीमाभागाचा मुद्दा पुढे आला तेंव्हा बाबुराव ठाकूर यांनी कर्नाटकची बाजू घेणाऱ्या या गुरुची साथ सोडली होती, पुढचा इतिहास सगळ्यांना माहीत आहे. मराठी भूभाग कर्नाटकात घालण्यासाठी तडफड केलेल्या देशपांडेंची ही अवस्था पाहिली की कर्नाटक आणि काँग्रेस ने त्यांचा फक्त वापर करून घेतला हेच स्पष्ट होते.