समाजाला दिशा देण्याचे मोलाचे कार्य पत्रकार करतात.अनेक अडचणींचा सामना पत्रकारांना वार्तांकनाच्यावेळी करावा लागतो.अलीकडे वृत्तपत्रात चोऱ्या,मारामाऱ्या आणि इतर नकारात्मक वृत्ताना अधिक प्रसिद्धी दिली जाते.समाजात अनेक चांगल्या गोष्टीही घडतात त्याकडे अधिक डोळसपणे पत्रकारांनी बघणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी केले.
बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन साजरा करण्यात आला.यावेळी कृष्णा शहापूरकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते.पत्रकार भवनात आयोजित कार्यक्रमात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी सदानंद सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर होते.
सकारात्मक बातम्या देण्यावर पत्रकारांनी भर द्यावा.वृत्तपत्रातून सकारात्मक बातम्या दिल्यामुळे समाजात निकोप वातावरण निर्माण होण्यास मदत होईल.पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी सरकारने कायदा करून पत्रकारांना कायद्याने संरक्षण देण्याची गरज असल्याचे मत कृष्णा शहापूरकर यांनी व्यक्त केले.
प्रारंभी महेश काशीद यांनी उपस्थितांचे स्वागत केले.प्रकाश माने यांनी प्रास्ताविक केले.गुरुनाथ भादवणकर यांनी आभार मानले.कार्यक्रमाला प्रकाश काकडे,विलास अध्यापक,शेखर पाटील,अनंत लाड यांच्यासह सदस्य आणि निमंत्रित उपस्थित होते.