पांढरी शुभ्र, एका ओळीत असलेली सुंदर दंतपंक्ती म्हणजे सौंदयार्हंचे एक लक्षणच! जसे सौंदर्याचे तसेच आरोग्याचेही. दातांचा त्यांच्या कामानुसार असलेला आकार, त्यांची मांडणी खरोखरच विस्मयकारक आहे. चांगले दात असणे हे निरोगी व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा भाग आहे. असे असले तरी या सुंदर दातांनाही आजार सुटलेला नाही. दातदुखीचा हा विकार बहुतेक सर्व व्यक्तींना कधी ना कधी होतोच.
कारणे आणि लक्षणे : दातदुखी बर्याच वेळा खूप असह्य होते. दातातून सतत कळा, ठणका येत राहतात. दुखर्या दातावर लगेचच योग्य उपचार केले नाहीत तर दात काढून टाकण्याशिवाय पर्याय राहत नाही.
चुकीच्या आहारपद्धतीमुळे दात किडू लागतात आणि हेच दातदुखीचे प्रमुख कारण आहे. आईस्क्रीम, शीतपेये, केक, मिठाई यासारखे गोड पदार्थ खाल्ल्याने दातावर त्यांचा रोप बसतो व किटण तयार होते. तोंडातील जीवाणू गोड पदार्थामधील साखरेचे आम्हात रुपांतर करतात. दातांवरील आवरणात कॅल्शियम असते. या कॅल्शियमचा आम्लाशी संयोग होऊन या आवरणाची झीज होते. तसेच दात किडू लागतात.
उपचार : दातदुखी अत्यल्प प्रमाणात असल्यास घरगुती उपचारांनी तसेच होमिओपॅथिक उपचारांनी कमी होते. परंतु तसे असूनही दंतवैद्यांचा सल्ला जरुर घ्यावा. आजकालचे दंतवैद्यकशास्त्र पुष्कळ पुढे गेले आहे. परंतु दातांची निसर्गदत्त देणगी टिकवून ठेवण्यासाठी अनेक उपचार व प्रतिबंधक उपायांची मदत घ्यावीच लागते.
होमिओपॅथी : लक्षणापरत्वे व व्यक्तीपत्व ते बरीच औषधं फक्त दातदुखीवर उपलब्ध आहेत. उदा. गोड खाल्ल्याने दात दुखत असल्यास नॅट्रम कार्ब हे उपयुक्त आहे. दात किडून दातांच्या मुळाशी खूप दुखते. दातांवर दाब पडल्यास अतिशय कळ येते. जबड्याची हालचाल झाल्यावर कळ कपाळापर्यंत जाणवते. स्पर्श व थंड पदार्थ किंवा पाणी अजिबात सहन होत नाही. अशा लक्षणावर स्टॅफीसॅग्रीया हे औषध उपयोगी ठरु शकते. दातांमधील कळ कानापर्यंत पोहोचते. दात लावल्यास एकदम ठणकते. दात सळसळतात अशावेळी प्लँटगो हे औषध घेता येते. होमिओपॅथीक औषधे तज्ञांच्या सल्ल्यानुसारच घ्यावी लागतात. अकारण तसेच अपुर्या माहितीने औषधोपचार करु नये. चुकीचे डोस तसेच चुकीच्या शक्तीचे औषध घेतल्याने इच्छित परिणाम साधता येत नाहीत.
बाराक्षर : कालीफॉस 6× हे औषध दातदुखीवर उपयुक्त आहे.
निसर्गोपच्चार : आले-थोडेसे आले ठेचून त्यात शेंदेलोण घालून त्याची छोटी गोळी करुन दुखर्या दाताखाली ठेवावी, थोड्याच वेळेत ठणका कमी होऊन आराम मिळतो.
मोठे लिंबू : लिंबामध्ये क जीवनसत्व भरपूर असते. त्याचा उपयोग दातांचे आणि हाडांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी होतो.
हिंग : लिंबाच्या रसात थोडा हिंग कालवून मिश्रण किंचीत गरम करावे. कापसाचा बोळा त्यात बुडवून ते दुखर्या दाताच्या खळग्यात बसवावा. थोड्याच वेळात कळ कमी येते.
लवंग : लवंग तेलात जंतूनाशक व वेदनाशामक गुणधर्म असतात. त्यामुळे दातदुखी थांबते.
मिरी : एक चिमूट मिरीपूड व एक चिमूट मीठ एकत्र करुन ते दंतमंजनासारखे वापरावे. हा उपचार रोज केल्याने दात किडत नाहीत. तसेच तोंडाला खराब वास येत नाही. हिरड्यांतून रक्त येणे थांबते आणि दातदुखीही कमी होते. दातांतून येणारे आवेग व कळा थांबतात. मिरपूड व लवंग तेल एकत्र करुन दातांत ठेवल्यानेही दातदुखी थांबते.
प्रतिबंध : दाताची व दाताभोवतालची झीज आणि हिरड्यातील जंतूंचा संसर्ग योग्य आहाराने टाळू शकता येतो. गोड पदार्थांचे प्रमाण आहारात कमी करावे, भरपूर कच्च्या भाज्या व कोंडायुक्त धान्य, सालीसकट डाळी यांचा आहारात समावेश करावा. जेवणानंतर खळखळून चूळा भराव्यात. दिवसातून दोनवेळा दात घासावेत. हिरड्यांना मसाज करावा. अन्नग्रहण करताना व्यवस्थित चावून खावे. फळं चावून खावीत. फळांचे रस, मिल्कशेक, आईस्क्रीम, मैद्याचे पदार्थ, अतिगोड, अतिआंबट पदार्थ तसेच अति उष्ण व अतिथंड पदार्थ खाण्याचे टाळावे. शीतपेये, फास्टफूड टाळावे. दातांच्या आरोग्यावर संपूर्ण पचनकार्य अवलंबून असते, असे मानण्यास हरकत नाही.