माता भगिनींनो इकडे लक्ष द्या….
सीमाभागातील तमाम माता- भगिनींनों साडी हट्ट पुरविण्यासाठी तुमचा ‘पती-भाऊ’ आहे खंबीर… तेंव्हा तुम्ही होऊ नका इतक्या गंभीर… साडी घेऊन कोणाच्या बंधनात अडकण्यापेक्षा स्वकर्तुत्वाची साडी घेऊन ‘महाराष्ट्र एकिकरण समिती’ च्या विजयाची गुढी उभारूया ना…?
दोनदा ‘ग्रामीण’ने दिली आहे विजयाची हुलकावणी…
तिसर्यांदा होऊ देऊ नका ती पुनरावृती,!
मतदारराजा जागा हो, मराठी अस्मितेचा धागा हो,!
जय हो,!
जय महाराष्ट्र देशा,
हे संदेश सध्या बेळगाव तालुका भागात जोरदार फिरत आहेत. कारण एकच साड्या वाटून मराठी महिलांना आपल्याकडे खेचून घेणाऱ्या राष्ट्रीय पक्षातील महिला उमेदवाराला विरोध करणे. तालुक्यातील तरुण पिढी जागृत झाली आहे आणि हा संदेश सर्वत्र व्हायरल होऊ लागला आहे.
विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना राष्ट्रीय पक्षातील एक राज्य महिला उपाध्यक्षा आणि स्वतः बेळगाव ग्रामीणचे आमदारपद भूषवू पाहत असलेली महिला साड्या वाटू लागली आहे. हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेऊन तेथे जायचे आणि दिसेल त्या महिलेला साडी द्यायची असा प्रकार सुरू आहे. आजकाल मतांसाठी लोक काय काय करतात, या बाईने महिला वर्गाला आकर्षित करून घेण्यासाठी साड्या वाटण्याचा मार्ग पत्करला आहे, या प्रकाराला विरोध करणारी तरुण पिढी मात्र सोशल मीडियाचा वापर करून आपल्या माता भगिनींना शहाणे करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
बेळगाव ग्रामीण चे राजकारण मागील दोन निवडणुकीत बिघडले. समितीचे दोन उमेदवार आणि त्यांचे मार्गदर्शक नेते इरेला पडले आणि त्यात भाजपचा विजय झाला. त्यावेळीही राष्ट्रीय पक्षातल्या या बाई निवडणुकीला बसल्या होत्या. त्यांच्याही पदरात आमदारकी पडली नाही. नंतर खासदारकीसाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले, समितीचे काही नेते हाताशी धरून पैसे वाटून बघितले पण तेथेही डाळ शिजली नाही, म्हणून आमदारकीचे स्वप्न घेऊन त्यांची वाटचाल सुरु आहे.
बेळगाव ग्रामीण मध्ये आपली उमेदवारी नक्की असे सांगून टाकून त्यांनी मतदानाची तयारीही सुरू केली आहे. मात्र त्यांच्याच पक्षातील काही जुन्या महिला कार्यकर्त्या मराठा समाजातील महिलेला तिकीट द्या म्हणून पुढे येऊ लागलेत. आशा वातावरणात साडी चोळी वाटायलाही विरोध आणि ते घेणाऱ्यांनाही शहाणपणाचे डोस पाजले जात असल्याने या बाईंची अवस्था अवघड होऊन बसली आहे.
समितीचा लढा भावनांचा आहे, यामुळे या लढाईत राष्ट्रीय पक्षांनी कितीही काही वाटले तरी शेवटी मत समितीलाच असे वातावरण असते, अंतर्गत बंड झाले तरच समितीचे नुकसान होऊ शकते, तर महिला भावनेच्या भरात साडीच्या मागे वाहत जाऊ नव्हेत यासाठी तरुण कामाला लागले आहेत.