काँग्रेस पक्षाच्या बेळगाव जिल्हा सरचिटणीस पदी पूर्वाश्रमीचे युवा समिती कार्यकर्ते एस एम बेळवटकर यांची निवड करण्यात आली. तसे अधिकृत पत्रच त्यांना देण्यात आले आहे. बेळवटकर सारख्या कार्यकर्त्याने समिती सोडणे हे अजिबात समर्थनीय नाही मात्र असे समितीला खिंडार पाडून राष्ट्रीय पक्ष आपली चाल लावत असताना कोण बेळवटकर गेला तर गेला…जाऊदेत त्यांचा त्यांना लखलाभ.. असे म्हणून हातावर हात धरून बसणेही योग्य नाही. आणि त्यांना जाण्याची वेळ कुणी आणून दिली त्यांनाही समितीने तितकेच दोषी आणि जबाबदार धरण्याची गरज आहे.
आज समिती सोडून बाहेर पडणारे सुंठकर आणि बेळवटकर निष्ठावंत समिती कार्यकर्त्यांच्या नजरेत खाली पडले आहेत. मात्र आपण ज्या संघटनेत होतो तेथे हेकेखोर कारभार वाढला यामुळे जावे लागले असे जेंव्हा हे लोक सांगतात हे पाहून हेकेखोर मंडळींनी स्वतःच्या निष्ठतेची जाहिरात करणे थांबवून आपण समितीचे स्वतःच्या स्वार्थासाठी किती नुकसान करत आहोत याची जाणीव करून घेण्याची वेळ आली आहे.
एस एम बेळवटकर हा कार्यकर्ता आता काँग्रेस च्या गळाला गेला, त्याची वक्तृत्व शैली आणि संघटन चातुर्य पूर्वी कधीच चर्चेत नव्हते, कारण संधीच द्यायची नाही हे हेकेखोर नेत्यांनी ठरवून टाकले होते, काँग्रेस च्या बेरकी नेत्यांनी ही गोष्ट हेरली आणि त्याला पक्षाचे जिल्हा सरचिटणीस पद देऊन टाकले, हे असेच होत राहिले तर आणखी खिंडार पडत राहणार याची दखल घ्यावी लागेल.
एक दुसरा गेला की त्याला गद्दार म्हणण्याची पद्धत आहे. मराठी भाषा, संस्कृती आणि भावनेच्या लढाईत चळवळ सोडणे ही गद्दारीच आहे. पण तो कुणामुळे गेला त्यालाही गद्दार म्हणण्याची वेळ येत नाही तोपर्यंत अशी गळती सुरूच राहणार आहे, मीच निष्ठ आणि बाकी सगळे नीच म्हणत स्वतःच स्वतःची उमेदवारी लादणाऱ्या मंडळींनी ही वेळ आणून ठेवलेली असताना पुन्हा त्यांचे सारेकाही खपवून घेणे संघटनेला महागात पडणार आहे.
जे बाहेर जात आहेत त्यांनीही संघटनेचा विचार करायला पाहिजे, राष्ट्रीय पक्षांनी दिलेली पदे महत्वाची नाहीत, भाषा महत्वाची याची जाण त्यांनी विसरली आणि त्याचे भांडवल करून हेकेखोर पुन्हा स्वतःची पाठ थोपटून घेऊ लागले हे सारेच दुर्दैवी आहे.
मध्यवर्ती समितीने याचा वेळीच विचार करून लायकी असणाऱ्यांना योग्य पदे देऊन हेकेखोरांना जागा दाखवून द्यायला पाहिजे होती, अजूनही वेळ गेली नाही, तसे झाले तर बाहेर गेलेल्यांची घरवापसी कार्यकर्तेच घडवून आणतील एकी सुद्धा आपोआप होईलच.
Trending Now