Tuesday, May 7, 2024

/

सुंठकर प्रवेशानंतर भाजपची रणनीती काय?

 belgaum

SHivaji sunthkr bjpकालपर्यंत म ए समितीत असणाऱ्या शिवाजी सुंठकर यांना भाजपने आपलेसे करून घेतले. भाजपच्या अनेक जणांना हा मोठा हादरा ठरला. खासदार प्रभाकर कोरे, विधानपरिषद सदस्य महातेश कवटगीमठ यांनी पक्षातल्या इच्छुकांना मोठा धक्का दिला आहे. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री पदाचे उमेदवार येडीयुरप्पा यांनी सुंठकर यांच्या बद्दल बरेच गोडवे गायिले आहेत, आता सुंठकर या मराठा नेत्याच्या शक्तीचा योग्य वापर करून घेण्यासाठीची रणनीती आखली जाऊ लागली आहे.
सुंठकर यांच्या बद्दल समिती नेते आणि समिती कार्यकर्ते संताप व्यक्त करत आहेत, ते साहजिकच योग्य आहे. मात्र भाजपमध्ये जाऊन केवळ मराठी म्हणून दुजाभावाचा सामना करावा लागलेल्या मराठी कार्यकर्त्यांना सुंठकर नवा आधार ठरले आहेत. तसे भासवण्याचा भाजप चा प्रयत्न आहे. सध्या समिती आणि काँग्रेस ला शह देण्यासाठी बेळगाव उत्तर किंवा ग्रामीण मध्ये सुंठकर यांचा वापर होऊ शकतो तसेच गरज पडल्यास बेळगाव दक्षिण मतदार संघातही सुंठकर यांच्या नावाचा किंवा उमेदवारीचा वापर करण्याचा हालचाली आहेत.
उत्तर व ग्रामीण पेक्षा दक्षिण मतदारसंघात भाजपकडे निश्चित चेहरा नसल्याने हा नवा राजकीय गेम होण्याची शक्यता जास्त आहे. येत्या महा पालिका निवडणुकीतही भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठी सुंठकर यांचा वापर करून घेण्याची चर्चा भाजप वरिष्ठ करत आहेत.
मनपा मधील सत्ताकारणाचा सुंठकर यांचा अनुभव लक्षात घेऊनच त्यांना प्रवेश देण्यात आला आहे. एकाद्या वेळेस आमदारकीची संधी मिळाली नाही तरी भाजपची सत्ता निर्माण करून महापौर होण्याच्या दृष्टीने सुंठकर आणि भाजप नेते प्रयत्न करणार आहेत अशी माहिती भाजप च्या गोटात चर्चेत आहे.
सुंठकर समिती सोडून गेले या बद्दल जितका संताप समितीत आहे तितकाच ते आले म्हणून भाजपात ही आहे. मराठी नेतृत्व घेऊन पुढे आल्याशिवाय आपला निभाव लागणार नाही हे जाणूनच भाजपने सुंठकर यांना फोडले आहे. आता त्यांनी कागदावर रंगवलेले आडाखे खरे होतात की फोल ठरतात हे पाहावे लागेल. मराठी माणसाला समिती शिवाय पर्याय नाही हे त्रिवार सत्य नाकारता येत नसताना देखील शिवाजींचा भाजप प्रवेश न एकीकडे न रुचणारा तर दुसरीकडे समितीला पोषक ठरणाराच असेल.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.