दिवाळी हा दिव्यांचा सण. आनंदि उत्साही वातावरणाची उधळण आणि एक नवी पहाट. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरू झालेल्या आणि अल्पावधीतच तुमच्या पसंतीस पात्र ठरलेल्या बेळगाव live ची ही पहिली दिवाळी. तसे पाहिले तर या आनंदी वातावरणात रमलेल्या साऱ्यांनाच दिवाळीच्या पहिल्या शुभेच्छा देताना आम्हालाही आनंद होतोय. आमच्यावर प्रेम करणाऱ्या साऱ्यांना या मनापासून शुभेच्छा आहेत.
आपुलकी, प्रेम आणि माणुसकी हे गुण दिवाळी सारखे सण मानवी मनात निर्माण करतात. हा सण तर प्रत्येकालाच अंधारातून प्रकाशाकडे नेणारा. ही प्रकाशवाट आपली आपणच निवडायला हवी, एकदा का या वाटेची कास धरली की जीवन सकारात्मक आणि समृद्ध होण्यास मदत ही होतेच. सध्याचे युग मंदीचे आहे. मागच्या दिवाळी नंतर चलनातील बदलांनी अनेकांचे दिवाळे निघाले. त्यातून वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवरील अर्थव्यवस्था कोलमडली आणि ती अध्याप सावरलेली नाही. एक माध्यम म्हणून अलिप्तपणे आणि कोणत्याही पक्षाची बाजू न घेता किंवा विरोधही न करता या बद्दल बोलायचे झाले तर मग परिस्थिती बिघडलेय आणि ती सावरण्याचे योग्य नियोजन दिसत नाही हे खेदाने म्हणावे लागेल.
मात्र रडत बसायची शिकवण हा सण आपल्याला देत नाही त्यामुळे सरकारी यंत्रणा असोत किंवा व्यक्तिगत स्वरूपात असो आपणच वेळीच नियोजनात्मक सावरासावर करायला हवी हेच आम्ही बेळगाव live च्या वतीने सांगू इच्छितो.
तुम्ही आम्हावर प्रेम करता, आणि इतर माध्यमांच्या बरोबरीनेच आमच्यावरही विश्वास ठेवता ही आमच्या दृष्टीने सकारात्मक गोष्ट आहे. बेळगावात तरुण भारत, सकाळ, पुढारी, स्वतंत्र प्रगती ,वार्ता, रणझुंझार ही स्थानिक दैनिके आहेत. तसेच मटा आणि लोकसत्ता या महाराष्ट्रीय दैनिकांचेही चाहते बरेच आहेत. तरीही ऑनलाईन या नव्या जमान्यात आम्हीही जम बसवू शकलो ते तुमच्या प्रेमाच्या जोरावरच. या साऱ्या दैनिकांची प्रेरणा आणि मार्गदर्शन यापुढेही लागणार आहे कारण मुद्रित माध्यमे सतत टिकून राहावीत याच विचारांचे आम्हीही आहोत.
आजवर बातम्यांच्या जोरावर बेळगावात सबसे तेज अशी मान्यता आम्ही मिळवली आहे. वाढती महागाई आणि स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी आता आम्हालाही जाहिरातींचा मार्ग धरावा लागेल, नव्या दिवाळीच्या पहाटेला जाहिराती देऊन तुम्ही आम्हाला आर्थिक दृष्ट्या बळकट कराल हीच अपेक्षा आहे.
विश्वासार्ह बातम्या, इंटरनेट च्या माध्यमातून समाज शिक्षण , मनोरंजन आणि प्रबोधन ही आमची उद्दिष्टे आहेत, ती साध्य करण्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य कराल ही अपेक्षा आम्ही अधिकारवाणीने ठेवली आहे