आर्ट्स् सर्कल, बेळगांव तर्फे रविवार दि. १५ ऑक्टोबर रोजी रामनाथ मंगल कार्यालय येथे सकाळी ६ वाजता साजऱ्या होणाऱ्या दिवाळी पहाट ह्या कार्यक्रमात श्रीमती अनुराधा कुबेर यांचं गायन होणार आहे. त्यांना तबल्यावर बेळगांवचेच श्री. अंगद देसाई आणि संवादिनीवर श्री. सौमित्र क्षीरसागर हे संगत करणार आहेत.
श्रीमती अनुराधा कुबेर यांच्या अल्पपरिचय
भेंडीबाजार घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका श्रीमती अनुराधा कुबेर यांना पंडित त्र्यंबकराव जानोरीकर ह्यांच्यासारख्या महान गायकाकडून पंधरा वर्षे तालीम मिळाली. सध्या त्या ख्यात संवादिनीवादक आणि संगीतज्ञ पं. अरविंद थत्ते यांचे मार्गदर्शन घेत आहेत.
निकोप असा आवाज लाभलेल्या अनुराधा यांनी शास्त्रीय आणि सुगम संगीताचा डोळस अभ्यास केलेला आहे. तीनही सप्तकातील त्यांचा मुक्त स्वर संचार त्यांच्या रियाज़ाची जाणीव करून देतो. आकाशवाणीच्या अ श्रेणी प्राप्त कलाकार.
भारतातील अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. सवाई गंधर्व महोत्सव, पुणे, विष्णू दिगंबर जयंती समारोह, दिल्ली, इंडिया इंटरनॅशनल सेंटर, एन् सी पी ए, आणि संगीत नाटक अॅकॅडमी येथील हे त्यातील महत्वाचे काही. त्यांना अनेक मानसन्मान प्राप्त झालेले आहेत. गानहिरा, सूरमणी, माणिक वर्मा पुरस्कार आदी त्यातील महत्वाचे.