ढगाळ वातावरणाचा फटका बसल्याने स्पाईस जेट च्या चेन्नई बेळगाव विमानसेवेला पहिल्याच दिवशी सव्वा तीन तास विलंब झाला आहे. तांत्रिक अडचणींमुळे सकाळी ९ ऐवजी हे विमान दुपारी १२.२० वाजता बेळगाव विमानतळावर उतरले.
यामुळे चेन्नईहून बेळगावला येणाऱ्या प्रवाशांना तितका वेळ विमानातच बसून रहावे लागले. तर या विमानाने पुढे बेंगळुरू किंवा चेन्नईकडे जाण्यासाठी बेळगाव विमानतळावर थांबलेल्या प्रवाशांना वाट बघत थांबावे लागले.
याबाबत केंद्रीय हवाईउड्डाण प्राधिकार चे बेळगाव विमानतळ प्रमुख राजेशकुमार मौर्य यांनी बेळगाव live ला माहिती देताना तांत्रिक अडचणींमुळे ही समस्या निर्माण झाली असे सांगितले आहे.
झाले असे की ठरलेल्या वेळे प्रमाणे हे विमान चेन्नई इथून सकाळी ७.२५ ला निघून ठीक ९ वाजता बेळगाव पर्यंत पोहचले होते. तीन ते चारवेळा प्रयत्न करूनही ढगाळ वातावरणामुळे ते बेळगावच्या सांबरा विमानतळावर उतरू शकले नाही.
प्रयत्न अपुरे पडल्याने अखेर वैमानिकाने इंधनाचीही क्षमता पहिली, यामुळे त्याने परत हे विमान बंगळूर ला नेण्याचा निर्णय घेतला, तेथे जाऊन इंधन भरल्यावर वैमानिक विमान घेऊन परत बेळगावला आला. यात तीन सव्वातीन तासांचा वेळ निघून गेला.
बेळगावात प्रवाश्यांना उतरवून येथे स्वागत स्वीकारून हे विमान परत आकाशात झेप घेत बेंगळूरकडे निघून गेले. असेही मौर्य यांनी सांगितले.
नूतन टर्मिनल चा वापर महिन्यात सुरू
बेळगाव विमानतळाला नूतन टर्मिनल बिल्डिंग लाभली आहे. मात्र अद्याप वापर सुरू झाला नाही, हा वापर येत्या महिन्याभरात सुरू केला जाणार आहे, असेही केंद्रीय हवाईउड्डाण प्राधिकार चे बेळगाव विमानतळ प्रमुख राजेशकुमार मौर्य यांनी बेळगाव live ला सांगितले.