ठेवीदारांची फसवणूक करून ठेवी परत देण्यास टाळाटाळ करणाऱ्या संगोळी रायन्ना सोसायटी विरोधात सहकार खात्याच्या साहाय्यक निबंधकांनी खडेबाझार पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवी कलम ४०६, ४०८ व ४२० नुसार शुक्रवार दि १ रोजी रात्री ही फसवणुकीच्या गुन्ह्याची फिर्याद दाखल करण्यात आली.
सोसायटीचे अध्यक्ष आनंद अप्पूगोळ, उपाध्यक्ष, सेक्रेटरी आणि सर्व संचालक मंडळावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोसायटीने ३१ मार्च रोजी सादर केलेल्या ऑडिट रिपोर्ट नुसार २३२ कोटी ६९ लाखाच्या ठेवी जमवल्या आहेत तर २४० कोटी ३१ लाख रुपये कर्ज वितरण केले आहे. याचा योग्य तपशील दिलेला नाही, यासाठी सम्पर्क साधता कार्यालये बंद असून समबंधीत लोक फोनही उचलत नाहीत, सध्या फसवणूक उघड झाली आहे, यामुळे ठेवीदार सोसायटीच्या कार्यालयासमोर गटा गटाने थांबून पैसे मागत आहेत, असे तक्रारीत लिहिले आहे.
सोसायटीने ठेवीदारांचे समाधान केले नाही, या सोसायटीकडे परतफेड करण्यासाठी भांडवल नाही. अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ सध्या फरार झाले आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध घेऊन तपास करा असेही तक्रारीत लिहिले आहे.
या सोसायटी व संचालक मंडळाने मोठ्याप्रमाणात ठेवी घेतल्या, मात्र संस्थेच्या उपनियमनुसार योग्य गुंतवणूक न करता आपल्या सहकार खात्याच्या मर्यादांचे उल्लंघन करण्यात आले आहे. याला वरील सर्वजण जबाबदार आहेत. १२ ऑगस्ट पासून संस्थेचे सर्व कामकाज बंद आहे, यावरही योग्य चौकशी करावी अशी मागणी सहकार खात्याच्या साहाय्यक निबंधकांनी केली आहे.